देशातील सर्वात मोठा कॉर्पोरेट घोटाळा ठरलेल्या ‘सत्यम कॉम्प्युटर्स’चा संस्थापक बी. रामलिंग राजू आणि अन्य चौघा जणांवर १४ वर्षांची बंदी घालण्याचे आदेश सेबीने दिले. तसेच अवैध पद्धतीने गोळा केलेली माया व त्यावरील व्याज मिळून एकूण १८४९ कोटींचा भरणा करण्याचे आदेशही सेबीने दिले आहेत. येत्या ४५ दिवसांत ही दंडाची रक्कम भरावी, असेही स्पष्ट केले आहे.
पांढरपेशी म्हटल्या जाणाऱ्या पाच संचालकांनी अत्यंत नियोजनबद्धरीत्या हा आर्थिक घोटाळा केला आहे. केवळ स्वार्थासाठी आणि व्यक्तिगत लाभासाठी हा घोटाळा करण्यात आला आणि त्यासाठी कंपनी व गुंतवणूकदारांची पद्धतशीरपणे फसवणूक करण्यात आली, असे ताशेरे ‘सेबी’ने ओढले आहेत.
सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीने गेली साडेपाच वर्षे प्रलंबित असलेल्या या प्रकरणाचा तपास पूर्ण करून निकाल जाहीर केला. आपल्या ६५ पानी आदेशात सेबीने ‘सत्यम कॉम्प्युटर्स’चा संस्थापक रामलिंग राजू याच्यासह ५ जणांना दोषी ठरवले आहे.
राजूबरोबरच त्याचा भाऊ बी. रामा राजू (व्यवस्थापकीय संचालक, सत्यम), वदलमणी श्रीनिवास (माजी मुख्य वित्तीय अधिकारी), जी. रामकृष्ण (माजी उपाध्यक्ष) आणि अंतर्गत हिशेब तपासणी विभागप्रमुख व्ही.एस. प्रभाकर गुप्ता आदींवर बंदी घालण्यात आली आहे.
येती १४ वर्षे भांडवली बाजारात कोणत्याही पद्धतीने सहभागी होण्यास त्यांना मज्जाव करण्यात आला आहे.

घोटाळा काय?
७ जानेवारी २००९ रोजी त्या वेळी देशातील चौथ्या क्रमांकाची आयटी कंपनी म्हणून नावाजलेल्या सत्यमचा संस्थापक असलेल्या रामलिंग राजू याने सेबीला ई-मेल पाठवून आपण कंपनीच्या जमा खात्यातील रकमेचा आकडा तसेच बँकांमधील ठेवींची रक्कम फुगवून सांगितल्याची कबुली दिली. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर, कंपनीने गुंतवणूकदारांच्या तसेच त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हितार्थ कंपनीच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचे आदेश सरकारने दिले होते.

सत्यम’च्या संस्थापकासह अन्य अधिकाऱ्यांनी केलेल्या या घोटाळ्यामुळे भांडवली बाजाराची प्रतिमाच डागाळली आहे. तसेच या बाजाराच्या विश्वासार्हतेला धक्का बसला आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक केली गेली आणि म्हणूनच असे घोटाळे करणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई गरजेची आहे, असे माझे ठाम मत झाले.
– राजीव कुमार अगरवाल, कायम सदस्य, सेबी