भविष्य निर्वाह निधी, विविध बचत योजनांवरील व्याज कमी होत असताना सिंगापूरच्या डीबीएस बँकेने बचत ठेवींवर वार्षिक ७ टक्के व्याज देण्याचे निश्चित केले आहे. भारतातील बँक क्षेत्रात हा या प्रकारच्या ठेवींवरील सर्वाधिक व्याजदर आहे.

वर्षभरापूर्वी बचत ठेवींवर अधिक व्याज देण्याची तीव्र स्पर्धा होती. यानुसार सध्या कोटक महिंद्र, येस बँक, आरबीएल या खासगी बँका तिच्या ठेवीदारांना सध्या वार्षिक कमाल ७ टक्क्यांपर्यंतचे व्याज देतात. मात्र त्यासाठी एक लाख रुपयांच्या ठेव रकमेची अनिवार्यता आहे.

आशियातील आघाडीची बँक म्हणून प्रसिद्ध असलेल्या डीबीएस बँकेने तिच्या किरकोळ व्यवसाय वृद्धिंगत करताना बचत ठेवींवर सर्वाधिक ७ टक्के व्याज देणाऱ्या विशेष योजनेचे अनावरण क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या उपस्थितीत मंगळवारी मुंबईत केले. बँकेने आधीच्या आर्थिक वर्षांतील तोटय़ाच्या तुलनेत २०१५-१६ मध्ये किरकोळ नफा नोंदविल्याकडेही या वेळी डीबीएस बँक इंडियाचे मुख्य कार्यकारी सुरोजित शोम यांनी लक्ष वेधले. डीबीएस समूहाने भारतातील व्यवसायाकरिता ६,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचेही ते म्हणाले.

बँकेचा देशातील कर्ज वितरणातील हिस्सा ५ टक्के असून तिचे भारतात ४०,००० बचत खातेधारक आहेत. ‘डीजीबँक’ या नव्या उपक्रमाद्वारे येत्या पाच वर्षांत बँक ५० लाख खाते व ५०,००० कोटी रुपयांवरील ठेवींचे लक्ष्य राखून असल्याचे याप्रसंगी स्पष्ट करण्यात आले.