बँकिंग अग्रणी स्टेट बँकेची सहयोगी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ बिकानेर अ‍ॅण्ड जयपूर (एसबीबीजे)ने जानेवारी ते मार्च २०१४ तिमाहीत एकूण अनुत्पादित कर्ज मालमत्तेत (एनपीए) २,७७३३ कोटी रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे स्पष्ट केले आहे. यंदा तिमाही वित्तीय निकाल जाहीर करण्यात आघाडी घेणाऱ्या या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने अपेक्षेप्रमाणे ‘एनपीए’ जोखीम बळावल्याचे संकेत दिले आहेत. बँकेच्या एकूण वितरित कर्जाच्या तुलनेत हे एनपीएचे ४.१८ टक्क्य़ांपर्यंत वाढले आहे, जे आधीच्या वर्षांत याच तिमाहीत ३.६२ टक्के असे होते. बँकेच्या नक्त एनपीएचे प्रमाणही २.२७ टक्क्य़ांवरून २.७६ टक्के म्हणजे १,७७१ कोटी रु. झाले आहे. यापैकी सरलेल्या तिमाहीतील भर ही ८१७ कोटींची आहे. तथापि निव्वळ व्याजापोटी कमावलेले उत्पन्न आणि ३.१४ टक्क्य़ांवरून ३.५५ टक्के असे सुधारलेले नफ्याचा परतावा (निम-मार्जिन) आणि शुल्कापोटी वाढलेले उत्पन्न यापायी बँकेला मार्च तिमाहीत २३८ कोटींचा निव्वळ नफा कमावता आला आहे, जो आधीच्या वर्षांतील तिमाहीच्या तुलनेत ३३.७१ टक्के वधारला आहे.