वाणिज्य बँकांचे सुमारे ७,००० कोटींचे कर्ज थकविणाऱ्या विजय मल्ल्या यांच्या मालकीच्या किंगफिशरच्या नऊ नाममुद्रा बँकांनी विक्रीस काढल्या आहेत. यासाठी एसबीआय कॅपिटलने पुढाकार घेतला आहे. कंपनीने या नाममुद्रा खरेदीदार इच्छुकांना आवाहन केले असून त्यांचे मूल्यांकन हे  ४,५०० कोटी रुपयांच्या पुढे केले आहे. ‘आहे त्या स्थितीत’ त्या विकण्याचे एसबीआय कॅपिटलने स्पष्ट केले आहे.
१७ विविध बँकांचे ७ हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकविणाऱ्या किंगफिशर एअरलाइन्सचे उड्डाण ऑक्टोबर २०१२ पासून जमिनीवरच आहे. किंगफिशरच्या अग्रनामासह मल्ल्या यांच्याकडे सातहून अधिक नाममुद्रा आहेत. विमान सेवा क्षेत्राशी पैकी अनेक नाममुद्रांची वैधता तर चालू वर्षांच्या अखेपर्यंत संपतही आहे.
किंगफिशर एअरलाइन्सबरोबर जोडलेल्या अन्य नाममुद्रेत फ्लाय किंगफिशर (दोन), (वैधता : १० जानेवारी २०१७), फ्लाइंग मॉडेल्स (वैधता : ६ ऑगस्ट २०१४), फ्लाय द गुड टाइम्स व फनलायनर (वैधता : ६ ऑगस्ट २०१४), किंगफिशर (१ नोव्हेंबर २०१४), फ्लाइंग बर्ड जिव्हाइस (५ नोव्हेंबर २०१४) यांचा समावेश आहे.
पैकी अनेक नाममुद्रा या किंगफिशर एअरलाइन्सबरोबर तर काही मुख्य प्रवर्तक युनायटेड ब्रेव्हरिजबरोबर जोडल्या गेल्या आहेत. या कामी पुढाकार घेणाऱ्या एसबीआय कॅपिटलच्या मुख्य प्रवर्तक स्टेट बँकेचे किंगफिशरकडे १,६०० कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे. किंगफिशर एअरलाइन्सचे मुंबईतील मुख्यालय तसेच मल्ल्या यांचे गोव्यातील निवासस्थानही बँकांकडे अद्याप तारण आहे.
या कंपनीपोटी १३ हजार कोटी रुपयांचे नुकसान सोसणाऱ्या मल्ल्या यांना नोव्हेंबर २०१० मध्ये कर्ज पुनर्बाधणी करताना या नाममुद्राही कर्ज देणाऱ्या बँकांकडे तारण ठेवाव्या लागल्या होत्या. एसबीआय कॅपिटलने नाममुद्रा खरेदीसाठी रस दाखविणाऱ्यांनो २१ एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे. किंगफिशरला दिलेले कर्ज अन्य वित्तसंस्थेला विकून आयसीआयसीआय बँक यापूर्वीच मुक्त झाली आहे.