विविध बँकांची कर्जफेडीबद्दल फसवणूक करणाऱ्या विजय मल्या यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठविली आहे. मालमत्तांची माहिती न दिले प्रकरणातील या नोटिशीला मल्या यांच्याकडून महिन्याभरात उत्तर अपेक्षित आहे.
बँकांच्या थकबाकी प्रकरणातील सुनावणी दरम्यान सरकारी वकिल मुकुल रोहतगी यांनी, मल्या यांनी ४.५ कोटी डॉलर रक्कम मिळालेल्या सर्व मालमत्तांसह अन्यची माहिती अद्याप न्यायालयाला दिली नाही, असे सोमवारी निदर्शनास आणले. मल्या यांना त्यांनी ब्रिटिश कंपनीला आपल्या मद्य कंपनीतील विकलेल्या हिश्यानंतर ही रक्कम मिळाली आहे.
मल्या यांनी न्यायालयाचे म्हणणे मान्य केले नसून मालमत्तेचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही, असे रोहतगी यांनी सांगितले. मल्या यांनी चुकीची माहिती दिल्याचेही वकिलांनी स्पष्ट केले. त्यावर न्या. कुरियन जोसेफ व आर. एफ. नरिमन यांच्या खंडपीठाने त्यांना येत्या चार आठवडय़ात उत्तर देणे बंधनकारक असल्याचे नमूद केले.