समभागांची खुली आणि सार्वजनिक विक्री करणाऱ्या कंपन्यांमध्ये त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अधिकाधिक वाटेकरी केले जावे असा नियमातील बदल भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने शुक्रवारी केला. अशा भागविक्री प्रक्रियेत कर्मचाऱ्यांना आजवर कमाल २ लाख रुपये मूल्यांपर्यंत समभाग खरेदी शक्य होती, ती आता कमाल ५ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

‘सेबी’च्या आयसीडीआर नियमांन्वये, भागविक्री प्रक्रियेत कर्मचाऱ्यांच्या हिश्शात वाढ केली जाणार असली तरी भागविक्री पश्चात कंपनीच्या एकूण भागभांडवलात कर्मचाऱ्यांचा वाटा ५ टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही, याची काळजी कंपन्यांना घ्यावी लागणार आहे. शुक्रवारी येथे झालेल्या सेबीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या आणि अन्य महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तथापि २ लाख रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या समभागांची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्याचा अर्ज हा त्या भागविक्रीतील कर्मचाऱ्यांसाठी राखीव हिश्शाचा भरणा पूर्ण झाला नसेल, तरच विचारात घेतला जावा, अशा पोटनियमाचे कलमही जोडण्यात आले आहे.