भांडवली बाजारातील अनियमतेपोटी डीएलएफच्या अध्यक्षांविरुद्ध व्यवहार बंदी जाहिर होऊन २४ तास होत नाही तोच नियामकाने १२ वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात टाटा फायनान्सचे तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक दिलिप पेंडसे यांना दोषी ठरविले आहे. टाटा समुहातीलच विद्यमान टाटा मोटर्ससह चार कंपन्यांच्या समभागांमध्ये व्यवहार करताना नियमांची पायमल्ली केल्याचा त्यांच्यावर ठपका होता.
या प्रकरणात पेंडसे यांना २४ डिसेंबर २०१२ मध्ये दोन वर्षांपर्यंत भांडवली बाजारात व्यवहार करण्यास सेबीने बंदी घातली होती. याविरुद्ध पेंडसे लवादात गेले होते. लवादाने सेबीला तपास करून १६ एप्रिल २०१४ रोजी नव्याने आदेश देण्यास सांगितले होते.
पेंडसे व्यवस्थापकीय संचालक असताना टाटा फायनान्स तोटय़ात गेल्याने टाटा समुहाने २००१ मध्ये त्यांच्यावर कारवाई करत त्यांच्याविरुद्ध तक्रारही केली होती. आपल्यावरील आरोपांचा इन्कार करणाऱ्या पेंडसे यांना या दरम्यान काही काळ तुरुंगातही रहावे लागले.
पेंडसेंविरुद्ध सर्वप्रथम ऑक्टोबर २००२ मध्ये टाटा फायनान्सतर्फे तक्रार आली होती. हिमाचल फ्युच्युरिस्टिक कम्युनिकेशन्स, टाटा इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड लोकोमोटिव्ह कंपनी (टेल्को म्हणजेच सध्याची टाटा मोटर्स), इन्फोसिस व सॉफ्टवेअर सोल्युशन्स इंडिया या चार कंपन्याच्या समभाग व्यवहारांमध्ये पेंडसे यांच्याबरोबर दोन दलाल पेढय़ा – झुनझुनवाला स्टॉकब्रोकर्स व प्रतिक स्टॉक व्हिजन याही सहभागी होत्या. या प्रकरणाचा तपास करण्यात आल्यानंतर सेबीने पेंडसेना एप्रिल २००९ मध्ये नोटिस पाठविली व डिसेंबर २०१२ मध्ये आदेश जारी केला. त्याला पेंडसेंनी लवादात आव्हान दिले. लवादाच्या निर्देशानंतर सेबीने पेंडसे यांना आपली भूमिका मांडण्याची संधी दिली. त्यानंतर तक्रारीत तथ्य आढळल्याचे कारण देत दोषी ठरविले.