प्रारंभिक खुल्या विक्रीच्या प्रक्रियेतून भांडवली बाजारात प्रवेश करण्याचा २३ कंपन्यांचा मार्ग नियामकाने बुधवारी खुला केला. या सर्व कंपन्यांची सूचिबद्धता चालू आर्थिक वर्षांतच होईल, असेही सेबीने स्पष्ट केले आहे.
व्यवसाय विस्तारासाठी बाजाराच्या माध्यमातून निधी उभारणीस सेबीने २३ कंपन्यांना परवानगी दिल्याचे बुधवारी स्पष्ट केले.
निधी उभारणीसाठी यंदा परवानगी मिळालेल्या कंपन्यांमध्ये कॅथॉलिक सिरियन बँक, एस. एच. केळकर अ‍ॅन्ड कंपनी, प्रभात डेअरी, दिलीप बिल्जकॉन, श्री शुभम लॉजिस्टिक्स, अमर उजाला पब्लिकेशन्स, एजीएस ट्रान्सॅक्ट टेक्नॉलॉजीज, एसएसआयपीएल रिटेल्स, नवकार कॉर्पोरेशन, प्रेसिजन कॅमशाफ्ट्स आदींचा समावेश आहे.
पैकी नुमेरो उनो क्लोदिंग व सद्भाव इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमार्फत एकूण ४९० कोटी रुपये उभारले जाणार आहेत. वस्त्रप्रावरणे निर्मितीतील नुमेरो उनो प्रति समभाग ६५ रुपयांचे ८४ लाख समभाग उपलब्ध करण्याच्या तयारीत असून कंपनी नव्या ८४ दालनांची साखळी उभारण्याच्या स्थितीत आहे.
तर सद्भाव इन्फ्रास्ट्रक्चर ४२५ कोटी रुपयांच्या निधी उभारणीसाठी ८१.०३ लाख समभाग बाजारात उपलब्ध करून देईल. भाग विक्रीसाठी सेबीकडे नव्याने प्रस्ताव सादर करण्यापूर्वी कंपनीचा ६०० कोटी रुपयांचा निधी उभारणीचा इरादा होता.