एमसीएक्स-एसएक्सला व्यवसाय परवाना दिल्यावरून सेबीच्या तत्कालीन अध्यक्षाविरुद्ध कारवाईचे फास टाकणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने आता सुमारे ५,६०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील ‘एनएसईएल’ प्रकरणात या बाजारमंचावर नियमन असणाऱ्या वायदा बाजार आयोगाचे माजी अध्यक्षांवरच रोख वळविला आहे. आयोगाच्या अध्यक्षपदासह ‘एमसीएक्स’चे अ-कार्यकारी अध्यक्ष राहिलेल्या व्यंकट चारी यांची या प्रकरणातील भूमिका तपास यंत्रणा आता तपासून बघत आहे.
एमसीएक्स-एसएक्सला व्यवसाय परवाना दिल्याबद्दल सेबीचे माजी अध्यक्ष सी. बी. भावे यांच्यासह भांडवली बाजार नियामकाचे माजी सदस्य के. एम. अब्राहम यांच्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने प्राथमिक तक्रार दाखल केली आहे. तपास संस्था आता एमसीएक्स-एसएक्सची मुख्य प्रवर्तक ‘फायनान्शियल टेक्नॉलॉजिज’चा तब्बल ९९.९९ टक्के हिस्सा असलेल्या ‘एनएसईएल’ प्रकरणात चारी यांची चौकशी करून कारवाई करता येईल का, या प्रयत्नात आहे.
दरम्यान, याबाबत आपल्याला अद्याप काहीही सांगण्यात आले नसून या प्रकरणात आपले नाव कसे गोवले जाऊ शकते, अशी शंका चारी यांनी व्यक्त केली आहे. असाच पवित्रा सेबीचे माजी अध्यक्ष भावे यांनीही केंद्रीय अन्वेषण विभागाच्या तक्रारीनंतर घेतला होता.
गुंतवणूकदारांचे ५,६०० कोटी रुपये अदा करू न शकलेल्या ‘एनएसईएल’वर सेबी तसेच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाची कारवाई सध्या कायम आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने आता वायदे बाजार आयोग तसेच एमसीएक्सच्या मुख्य पदावर राहिलेल्या व्यंकट चारी यांनी घेतलेले निर्णय तपासून बघत आहे. १९८४ ते १९८७ दरम्यान आयोगाचे अध्यक्षपद भूषविल्यानंतर चारी हे एमसीएक्सवर अ-कार्यकारी अध्यक्ष म्हणून २००३ ते २०१३ कार्यरत होते. आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार निवृत्तीचे वय ७० असल्यामुळे चारी यांनी यानंतर एमसीएक्सची धुरा तब्बल १० वर्षे हाकली. यानंतर ते स्वतंत्र संचालक बनले. तर मुख्य प्रवर्तक फायनान्शिअल टेक्नॉलॉजीजचे अ-कार्यकारी संचालक झाले. याच समूहाशी निगडित ‘इंडियन एनर्जी एक्स्चेंज’चेही ते अ-कार्यकारी अध्यक्ष आहेत.