निर्देशांकांचा घसरणप्रारंभ; जागतिक स्तरावरही सावट

सेबीने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभाग व्यवहारांवर घातलेल्या बंदीचे नकारात्मक पडसाद भांडवली बाजारात नव्या आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी उमटले.

सत्रात २९,१६३.५४ पर्यंत आपटणाऱ्या सेन्सेक्सने दिवसअखेर १८४.२५ अंश घसरणीसह २९,२३७.१५ वर विराम घेतला. तर ६२.८० अंश घसरणीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सोमवारी त्याचा ९,१०० चा स्तर सोडत ९,०४५.२० वर स्थिरावला.

भांडवली बाजार नियामक सेबीने शुक्रवारी उशिरा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभाग व्यवहारांवर र्निबध जारी केले होते. त्याचबरोबर दहा वर्षांपूर्वीच्या प्रकरणात मिळविलेली रक्कम व्याजासह जमा करण्याचे आदेशही दिले होते. परिणामी कंपनीचा समभागही सत्रअखेर ३ टक्क्य़ांपर्यंत घसरला. त्यामुळे सेन्सेक्समधील अव्वल कंपनीचे बाजार भांडवली एकाच व्यवहारात १२,४८८ कोटी रुपयांनी रोडावले.

रिलायन्सबाबतच्या निर्णयाची धास्ती गुंतवणूकदारांनी सोमवारी सप्ताहाच्या पहिल्या दिवशीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून घेतली. सत्राच्या प्रारंभालाच सेन्सेक्समध्ये जवळपास शतकी निर्देशांक आपटी नोंदविली गेली. ही घसरण दिवसभरात मुंबई निर्देशांकाला २९,१५० च्या नजीक घेऊन गेली. तर निफ्टीचा प्रवासही या दरम्यान ९,०२४.६५ पर्यंत येऊन ठेपला.

सेन्सेक्समध्ये टाटा स्टील सर्वाधिक, ३.१५ टक्क्य़ांसह आपटला. त्याचबरोबर एशियन पेंट्स, गेल, ओएनजीसी, अदानी पोर्ट्स, हीरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्सनाही कमी मागणी राहिली.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांचेही मूल्य सोमवारी जवळपास दोन टक्क्य़ांपर्यंत घसरले. तर औषधनिर्माण क्षेत्रातील सन फार्मा, ल्युपिन आदींचेही समभाग मूल्य घसरले. मुंबई निर्देशांकातील ३० पैकी केवळ ५ समभागांचे मूल्य उंचावले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद निर्देशांक सर्वाधिक २.६० टक्क्य़ांनी घसरला. मुंबई शेअर बाजाारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकही घसरले.

आशियातील प्रमुख निर्देशांकांमध्येही सप्ताहारंभी घसरणच होती. तर युरोपातील विविध भांडवली बाजारांची सुरुवात घसरणीनेच झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेच्या आर्थिक धोरणांचा अद्यापही धसका असल्याचे जाणवत आहे. आरोग्यनिगा विषयक विधेयक सादर करून तमाम बाजाराची निराशा अमेरिकेत व्यक्त झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक ध्येयधोरणे राबविण्याच्या धडाक्याबाबत बाजारांनी पुन्हा एकदा शंका निर्माण करण्याचे वातावरण निर्माण केले आहे.

स्थानिक भांडवली बाजारांनी गेल्या सलग दोन सत्रातील तेजीनंतर सोमवारी घसरण नोंदविली आहे. सोमवारी संसदेत सादर झालेल्या वस्तू व सेवा कर विधेयकाकडेही बाजाराने फारसे सकारात्मकतेने घेतले नाही.

चालू आठवडय़ात महिन्यातील वायदापूर्तीचे अखेरचे व्यवहार होणार आहेत. तर पुढील महिन्यात कंपन्यांच्या निकालावर नजर असेल.

डॉलरच्या तुलनेत रुपया दीड वर्षांत भक्कम

दीड वर्षांच्या उच्चांकाला पोहोचलेल्या डॉलरच्या तुलनेतील रुपयाचे मूल्य मात्र बाजाराने अव्हेरले. आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी परकी चलन विनिमय मंचावर रुपया सोमवारी एकाच व्यवहारात तब्बल ३७ पैशांची झेप घेत ६५.०४ या गेल्या २८ ऑक्टोबर २०१५ नंतरच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला. यापूर्वी चलन ६४.९३ वर होते. स्थानिक चलनाचा गेल्या १७ महिन्यांचा हा उच्चांक ठरला. व्यवहारात रुपया सोमवारी ६५.०१ पर्यंत गेला होता.

गुढीपाडवा पूर्वसंध्येला सोने-चांदी दरचमक

गुढीपाडवाच्या पूर्वसंध्येला सोमवारी सोने, चांदीचे दर पुन्हा एकदा तेजीकडे वळले. शहरातील सराफा बाजारात सोने दराने पुन्हा एकदा तोळ्यासाठी २९ हजार रुपयांचा फेरा धरला. गेल्या आठवडय़ातील शनिवारच्या तुलनेतील त्यातील वाढ ही जवळपास दीडशे रुपयांची असली तरी मौल्यवान धातू आता १० ग्रॅमसाठी २९,००० रुपयांच्या परिघात आहे. तर चांदीचा दर सोमवारी किलोमागे थेट ४९५ रुपयांनी उंचावत ४२ हजार रुपयांच्या पुढे गेले. पांढरा धातू दिवसअखेर सराफा बाजार मंचावर किलोसाठी ४२,१५५ रुपयांवर स्थिरावला.