भांडवली बाजार नियंत्रक – ‘सेबी’शी संबंधित तंटे-कज्जांची गतिमान सुनावणी होऊन लवकर तड लागावी यासाठी राजधानी दिल्लीत विशेष सेबी न्यायालयाची स्थापना करण्यात आली. देशभरात स्थापण्यात आलेले हे चौथे विशेष सेबी न्यायालय आहे. २०१४ मध्ये सेबी कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्तीनंतर मुंबई, कोलकाता आणि चेन्नई येथे तीन विशेष न्यायालये कार्यान्वित झाली असून, या मालिकेतील चौथे न्यायालय दिल्लीत स्थपण्याची प्रक्रिया मंगळवारी सुरू झाल्याची घोषणा करण्यात आली. सरकार आणि उच्च न्यायालयाशी सल्लामसलत करून या विशेष न्यायालयांची रचना करण्यात आली आहे. ही विशेष न्यायालयांवर केंद्र सरकारकडून एका न्यायाधीशाची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीशी विचारविनिमय करून केली जाईल. सेबी कायद्यातील दुरुस्तीने नव्याने प्राप्त झालेल्या अधिकारांमुळे सेबीला नियमभंग करणाऱ्या कंपन्यांकडून दंडवसुली, दंडवसुली करताना बँक खाते व स्थावर-जंगम मालमत्तांवर जप्ती आणि प्रसंगी आरोपीला अटक करण्याचेही अधिकारही ‘सेबी’ने मिळविले आहेत.