जागतिक भांडवली बाजारातील तेजी आणि आर्थिक सुधारणांच्या प्रगतीवर सलग दुसऱ्या दिवशी स्वार होत मुंबई शेअर बाजाराने बुधवारी पुन्हा ४०० अंशांची भर सेन्सेक्समध्ये टाकली. तर १३० अंश वाढीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीलाही ७,८०० चा टप्पा विनायास पार करता आला.

४०१.७१ अंश वाढीसह सेन्सेक्स गुरुवारअखेर २५,७१९.५८ वर, तर १३०.३५ अंश वाढीमुळे निफ्टी व्यवहार संपताना ७,८१८.६० पर्यंत पोहोचला. भारतीय भांडवली बाजार आता सप्ताह उंचीवर आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या रूपात आर्थिक सुधारणेला गती बाजारात प्रतिबिंबित झाली.

बाजाराने मंगळवारीही ४२४.०६ अंश वाढ नोंदविली होती. यामुळे सेन्सेक्स २५,३१७.८७ पर्यंत पोहोचताना त्याच्या गेल्या १५ महिन्यातील तळातून बाहेर आला होता. तर निफ्टीला १२९.४५ अंश वाढ राखल्यामुळे त्याचा ७,७०० चा टप्पा पार करता आला होता. तर आधीच्या सलग दोन व्यवहारांत सेन्सेक्सने ८७०.९७ अंश आपटी नोंदविली आहे. सप्ताहारंभी त्याने २५ हजाराखालील स्तर अनुभवला होता. डॉलरच्या तुलनेतील रुपयाचा प्रवासही सलग दोन व्यवहारांत दोन वर्षांच्या किमान स्तरावरून तेजीकडे झाल्याचे भांडवली बाजारात स्वागत होत आहे.

जागतिक स्तरावर चीन, जपान तसेच अमेरिकेतील भांडवली बाजारातील तेजीच्या जोरावर येथील बाजाराचे व्यवहारही निर्देशांक वाढीसहच सुरू झाले. त्यातच भारतात  मंत्रिमंडळाच्या निर्णयाने निर्देशांकांचा वरचा टप्पा विस्तारत गेला.

 

जपानच्या ‘निक्केई’ची ७.७१ टक्के झेप!

चीनमधील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढविण्यासाठी चिनी धोरणकर्ते लवकर ठोस आर्थिक उपाययोजना जाहीर करण्याच्या अटकळीवर गुरुवारी समस्त आशियाई निर्देशांक तेजीच्या लाटेवर स्वार झाले. आशियातील शांघाय, हँग सेंग आदी निर्देशांकही ४ टक्क्यांपर्यंत वधारले. तर जपानचा निक्केई-२२५ हा एकाच व्यवहारात तब्बल ७.७१ टक्के उसळला. २००८ मधील अर्थ-अरिष्टानंतरची त्याची ही सर्वात मोठी झेप ठरली. तर युरोपातील बाजारांमध्येही सुरुवातीची निर्देशांक झेप ही २.५० टक्क्यांपर्यंतची होती.