चिनी निर्देशांकांच्या प्रतिसादावर ‘काळा सोमवार’ अनुभवणाऱ्या भांडवली बाजाराने या देशाने केलेल्या व्याजदर कपातीबाबतची चिंता आठवडय़ातील तिसऱ्या व्यवहारात पुन्हा एकदा मोठय़ा घसरणीने नोंदविली. मंगळवारी घेतलेल्या तेजीच्या विश्रामानंतर सेन्सेक्स व निफ्टी परत खाली आले.
यामध्ये मुंबई निर्देशांकाने ३१७.७२ अंश तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ८८.८५ अंश घसरण राखली. परिणामी दोन्ही निर्देशांक अनुक्रमे २५,७१४.६६ व ७,७९१.८५ वर आले. एक टक्क्याहून अधिक घसरण नोंदविणारे दोन्हीही निर्देशांक त्याच्या अनोख्या टप्प्यापासून ढळले आहेत.
सप्ताहारंभीच्या १,६०० हून अधिक अंश आपटीने सेन्सेक्स सोमवारी थेट २६ हजारांच्याही खाली आला होता. दुसऱ्या दिवशीच्या सत्रात निर्देशांक अवघ्या २९०.८२ अंशानेच वाढल्याने मुंबई निर्देशांकाला पुन्हा २६ हजारांवरील प्रवास नोंदविता आला.
चीनच्या मध्यवर्ती बँकेने कर्जासह ठेवींवरील व्याजदरही कमी केल्याची चिंता गुंतवणूकदारांनी व्यक्त केली. असे करताना गुंतवणूकदारांनी सेन्सेक्सला २५,६५७.५६ पर्यंतच्या तळातही आणून ठेवले. सत्राच्या सुरुवातीलाच मुंबई निर्देशांक २६ हजार पार झाला होता.
महिन्याच्या वायदा पूर्तीचे व्यवहार गुरुवारी होणार असल्यानेही बाजारात बुधवारी गुंतवणूकदारांनी निवडक क्षेत्रातील समभागांमध्ये नफेखोरी करून घेतली. मात्र बँक, माहिती तंत्रज्ञान, आरोग्य निगा, तेल व वायू, भांडवली वस्तू, वाहन, ग्राहकोपयोगी वस्तू आदी निर्देशांक घसरले.
१.६८ टक्के अशा सर्वाधिक प्रमाणात बँक निर्देशांक खाली आला. तर सेन्सेक्समधील १८ समभागांचे मूल्य कमी झाले. भेल, टाटा मोटर्स, विप्रो, कोल इंडियाच्या समभागांमध्ये मूल्य घसरण झाली. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकांमध्ये संमिश्र हालचाल नोंदली गेली.
चीनमधील भांडवली बाजारांचा अद्यापही नकारात्मक प्रवास सुरू आहे. मात्र आठवडय़ातील तिसऱ्या दिवशीच्या व्यवहारात तेथील निर्देशांकांची घसरण काहीशी कमी झाली. शांघाय, शेनझेन आदी निर्देशांक २ टक्क्यांपर्यंत घसरले होते. आशियाईतील जपान, कोरियाचे निर्देशांक तेजीत होते. तर विकसित देशातील भांडवली बाजारांचा प्रवास मंगळवारप्रमाणेच तेजीसह सुरू झाला होता.

सोने-चांदीत उतार
मुंबई : सराफा बाजारात मौल्यवान धातूच्या दरांमध्ये बुधवारी कमालीचा उतार नोंदला गेला. स्टॅण्डर्ड सोन्याचे तोळ्याचे दर ३५५ रुपयांनी कमी होऊन २६,४४५ रुपयांवर आले आहेत, तर चांदीचा किलोचा भाव एकदम ७८५ रुपयांनी खाली येत ३५ हजार रुपयांवर स्थिरावला.

रुपया ४ पैसे भक्कम
मुंबई : डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलनाचे मूल्य पुन्हा उंचावले. ४ पैशांनी वाढत रुपया बुधवारी ६६.१४ वर पोहोचला. ६६.२२ या किमान स्तरावर व्यवहाराची सुरुवात करणारा रुपया सत्रात ६६.०७ पर्यंत उंचावला, तर ६६.३७ हा त्याचा व्यवहारातील किमान स्तर राहिला.

तेल किंमतीत चढ
लंडन : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर पुन्हा एकदा सावरले आहेत. ब्रेन्ट तेलाने त्याचा प्रतिपिंप ४५ डॉलरचा प्रवास बुधवारी अनुभवला. अमेरिकेतील इंधन उत्पादन साप्ताहिक तुलनेत घसरले आहे. जुलैपासून तेलाच्या किमती आतापर्यंत २५ टक्क्य़ांनी घसरल्या आहेत.