आर्थिक सुधारणांच्या आशेवर गेल्या काही सत्रांपासून सकारात्मक वाटचाल करणारा मुंबई शेअर बाजार मंगळवारी ‘मूडीज्’च्या आशादायक अहवालामुळे दोन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. एकाच सत्रात तब्बल त्रिशकी झेप घेत ‘सेन्सेक्स’ १८,८४२ पर्यंत गेला आहे. ९१.५५ अंश वाढल्यामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’देखील ५,७२७,४५ वर स्थिरावताना दोन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
आर्थिक सुधारणांना दिशा देणाऱ्या विविध अर्थविषयक विधेयकांवर संसदेत मंजुरीची मोहोर उमटण्याची प्रतीक्षा आहे. मात्र त्यावर भांडवली बाजाराने यापूर्वीच सतत निर्देशांकात वाढ राखून आशा कायम ठेवली आहे. अशाच वातावरणात आंतरराष्ट्रीय संस्था ‘मूडीज्’ने आठवडय़ाच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेबद्दल आशावाद निर्माण करीत ‘स्थिर’ पतमानांकनाची ग्वाही दिली. त्याचा योग्य तो परिणाम बाजारात लगेच दिसून आला.
भांडवली बाजारातील आजच्या मोठय़ा तेजीला युरोपातील ग्रीसला अर्थसहाय्य मिळाल्याबद्दल एकूणच जागतिक शेअर बाजारांनी केलेल्या स्वागताचीही किनार लाभली. थेट विदेशी गुंतवणुकीबाबत संसदेत विरोधकांची सहमती होत नसतानाही ‘आम्ही मतदानासाठी अपेक्षित आकडा गाठू’ या पंतप्रधानांच्या दिलाशानेही प्रमुख निर्देशांकांनीही धास्ती सोडत वाढीचा पल्ला गाठला.
मुंबई शेअर बाजारातील सर्व १३ क्षेत्रीय निर्देशांकांनी ३.२ टक्क्यांपर्यंतची वाढ नोंदविली. तर ‘सेन्सेक्स’मधील २८ समभाग तेजीसह बंद झाले. भारती एअरटेल, स्टरलाईट, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, हिंदाल्को, सिप्ला, आयटीसी, इन्फोसिस, बजाज ऑटो यांचे समभाग मूल्य वधारले. ३०५ पैकी २२५ अंशांची वाढ तर आयटीसी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, रिलायन्स, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक यांच्यामुळे नोंदली गेली.
सार्वजनिक क्षेत्रातील केवळ एनटीपीसी आणि ओएनजीसी यांचीच केवळ आजच्या मोठय़ा निर्देशांक वाढीतही नकारात्मक सूचीत वर्णी लागली. बांधकाम, विद्युत उपकरण, बँक, माहिती व तंत्रज्ञान आदी निर्देशांकांनी १ ते ३ टक्क्यांपर्यंतची वाढ नोंदविली.