जागतिक स्तरावर प्रतिकूल बनत असलेल्या अर्थस्थितीतून स्थानिक भांडवली बाजाराच्या अस्वस्थतेने बुधवारी पुन्हा एकदा प्रत्यय दिला. परिणामी, दोन दिवसांच्या तेजीतून कमावलेले सर्व काही सेन्सेक्सने बुधवारच्या ३८२ अंशांच्या घसरगुंडीतून गमावले. २५,४८२.५२ या दोन महिन्यांपूर्वीच्या खालच्या स्तरावर सेन्सेक्सने पुन्हा फेर धरला.
बुधवारच्या व्यवहारात मोठय़ा प्रमाणात झालेल्या विक्रीचा सर्वाधिक फटका आघाडीच्या आयटी समभागांना बसला. दोन दिवसांच्या तेजीतून ७८०० ची पातळी पुन्हा कमावणाऱ्या, निफ्टी ५० निर्देशांकही १०५.७५ अंशांची घसरण दाखवून ७,७३१.८० या पातळीवर अवनत झाला. जागतिक अर्थस्थितीबाबतच्या चिंतेत प्रति डॉलर ६६.३० स्तरावरील रुपयाच्या तीव्र घसरणीचाही बाजाराने धसका घेतल्याचे आढळून आले.