शेअर बाजारात सलग दुसऱ्या व्यवहारातील घसरणीमुळे सेन्सेक्स मंगळवारी २७ हजारापासून आणखी दुरावला. मुंबई निर्देशांकात अर्धशतकी घसरण नोंदविणाऱ्या एकूणच शेअर बाजारात मंगळवारीही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचा दबाव राहिला.

५७.५८ अंश घसरणीसह सेन्सेक्स २६,८४६.५३ पर्यंत तर ११.९० अंश घसरणीसह निफ्टी ८,१३१.७० वर आला. सेन्सेक्समधील निम्मे-निम्मे समभाग घसरण व तेजीच्या यादीत राहिले. व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा ६५च्या खाली उतरल्याची धास्तीही बाजाराने गंभीर घेतली.
इन्फोसिसच्या आखडत्या महसूल अंदाजामुळे सप्ताहारंभी १७५ अंश घसरण नोंदविणाऱ्या मुंबई शेअर बाजाराचा मंगळवारचा प्रवास व्यवहारानंतर जाहीर होणाऱ्या टीसीएसच्या वित्तीय निकालाच्या प्रतीक्षेत झाला. त्याचबरोबर बाजारात सत्रानंतर जाहीर झालेल्या सप्टेंबरमधील वाढत्या महागाई दराची चिंताही उमटली, तर टीसीएसचा समभाग सत्रअखेर अवघ्या ०.१९ टक्क्य़ासह २,५९७.४० पर्यंत वाढला.
क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक घसरण नोंदविणाऱ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात १.०३ टक्के आपटी राखली गेली. सत्रात सेन्सेक्स २६,९१८.५२ पर्यंत झेपावला होता. तर व्यवहारात निफ्टीने ८,१०० खालील तळ अनुभवला होता. मुख्य निर्देशांकात घसरण नोंदली गेल्यानंतर मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक मात्र किरकोळ अंश वाढ नोंदविणारे ठरले.