निर्देशांकांची दोन  महिन्यांतील सर्वोत्तम मुसंडी
५०० अंश वाढीमुळे ‘सेन्सेक्स’२८ हजारांनजीक
१५० अंशांची भर घालत ‘निफ्टी’ ८,५०० वेशीवर

एकाच व्यवहारात तब्बल ५०० हून अधिक अंशांची झेप घेत सेन्सेक्स सप्ताहारंभीच २८ हजारांनजीक पोहोचला. मुंबई निर्देशांकाने सत्रातील सर्वात मोठी उडी २० जानेवारीनंतर सोमवारी प्रथमच नोंदविली.
५१७.२२ अंश वाढीसह सेन्सेक्स २७.९७५.८६ वर बंद झाला. १५०.९० अंशांची भर घालत राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,४९२.३० पर्यंत पोहोचला. सत्रात त्याने ८,५०० पर्यंत मजल मारली होती.
मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही आठवडय़ातील पहिल्याच दिवशी जवळपास दोन टक्क्यांची वाढ सोमवारी नोंदविली. जागतिक भांडवली बाजारातील तेजीच्या जोरावर येथेही उल्लेखनीय कामगिरी झाली.
सोमवारच्या सुरुवातीच्या व्यवहारातच २८ हजाराला गाठणाऱ्या सेन्सेक्सने सत्रात २८,०१७.९७ पर्यंत मजल मारली. मुंबई निर्देशांकाची यापूर्वीची सत्र झेप ५२२.६६ अंश होती.
मध्य पूर्वेतील युद्धस्थिती अद्याप स्थिरावली नसली तरी जगातील प्रमुख बाजारातील निर्देशांकांमधील वाढ व स्थानिक पातळीवर निरंतर घसरणीने आकर्षक भावात उपलब्ध समभागांच्या गुंतवणूकदारांनी केलेली जोरदार खरेदी निर्देशांकांत मोठी भर घालणारी ठरली. कच्च्या तेलाच्या दरातील नरमाईही बाजाराच्या पथ्यावर पडली.
सेन्सेक्समधील तब्बल २६ समभागांचे मूल्य उंचावले. त्यातही भारती एअरटेल सर्वाधिक ३.५५ टक्के वाढीसह आघाडीवर राहिला. त्याचबरोबर एचडीएफसी बँक, ओएनजीसी, आयटीसी, कोल इंडिया समभागांची वाढही ३ टक्क्यांहून अधिक राहिली.
आयटीसी, अ‍ॅक्सिस बँक, एल अ‍ॅन्ड टी, कोल इंडिया, भेल, हिरो मोटोकॉर्प, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक हेही सेन्सेक्सच्या तेजीत सामील झाले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये भांडवली वस्तू निर्देशांक २.८२ टक्क्यांनी वाढला.
बाजारातील सप्ताहारंभीच्या मोठय़ा तेजीत बँक, दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान समभागांनीही मोलाची कामगिरी बजाविली. सर्व १२ क्षेत्रीय निर्देशांक ०.४७ ते २.८२ टक्क्यांपर्यंत वाढले. स्मॉल व मिड कॅप निर्देशांक अनुक्रमे ३.४ व १.९ टक्क्यांनी उंचावले. विशेषत: मूल्यात्मक खरेदीचा लाभ हा मिड आणि स्मॉल कॅप क्षेत्रातील अनेक समभागांना होताना दिसून आला.
मुंबई शेअर बाजारातील एकूण समभागांपैकी २,०४२ समभाग तेजीच्या यादीत राहिले. तर ७५३ समभागांना मोठय़ा निर्देशांक वाढीतही मूल्य घसरणीला सामोरे जावे लागले. बाजारात सोमवारी २,५५२.४५ कोटी रुपयांचे व्यवहार नोंदले गेले.
या आठवडय़ात शेवटचे दोन दिवस म्हणजे २ व ३ एप्रिलला सार्वजनिक सुट्टय़ांमुळे बाजारात व्यवहार होणार नाहीत.