ऐतिहासिक शिखराला स्पर्श करून दिवसअखेर माघार

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी ५० निर्देशांकाने मंगळवारच्या व्यवहार सुरू होताच, १०,००० अंशांच्या ऐतिहासिक टप्पा ओलांडणारी झेप दर्शविली. भारतीय उद्योगक्षेत्र आणि प्रत्येक भारतीयासाठी हा एक महत्त्वाचा क्षण ‘एनएसई’ मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात उत्सवासारखा साजरा करण्यात आला. बरोबरीने मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने १०० हून अधिक अंशांची प्रारंभिक मुसंडी घेतली. ‘सेन्सेक्स’नेही ३२,५०० हे विक्रमी शिखर मंगळवारच्या व्यवहारात पहिल्यांदाच पाहिले.

नव्या आठवडय़ाची सुरुवात करताना निफ्टीने सोमवारी १० हजारानजीकचा प्रवास नोंदविला. तेजीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सोमवारी बंद झाला होता. मंगळवारी मात्र त्याने सुरुवातीलाच १० हजारांचा स्तर गाठला. व्यवहारात तो १०,०११.३० पर्यंत झेपावला. मात्र दिवसअखेर त्याला १० हजारावर कायम राहता आले नाही.

मंगळवारी दिवसअखेर  मात्र निफ्टी अनोख्या १० हजाराच्या पातळीपासून दुरावला. तर सेन्सेक्सही किरकोळ घसरणीने त्याच्या उच्चांकावरून माघारी फिरला. १७.६० अंश नुकसानामुळे सेन्सेक्स ३२,२२८.२७ पातळीवर स्थिरावला. तर १.८५ अंश घसरणीसह निफ्टी ९,९६४.५५ वर बंद झाला. दुपारनंतर गुंतवणूकदारांच्या नफेखोरीमुळे बाजार किरकोळ घसरणीसह बंद झाले.

निफ्टी मंचावरील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे ०.४० व ०.११ टक्क्यांनी वाढले. राष्ट्रीय शेअर बाजारातील ७४८ कंपन्या तेजीत राहिल्या. तर बाजारातील उलाढाल २५,६५०.९६ कोटी रुपये नोंदली गेली.

मुंबई निर्देशांकाने मंगळवारच्या सत्रात नवा विक्रम स्थापन केला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ३२,३७४.३० वर होता. हाच त्याचा व्यवहारातील सर्वोच्च व ऐतिहासिक टप्पा ठरला. सेन्सेक्स गेल्या सलग दोन व्यवहारात ३४१.४७ अंशांनी घसरला आहे.

कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांमुळे सत्रात तेजी तर दिवसअखेरची घसरण ही अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या बैठक चिंतेमुळे नोंदली गेली, अशा शब्दात भांडवली बाजाराच्या मंगळवारच्या व्यवहाराचे निरीक्षण जिओजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी नोंदविले आहे.

सेन्सेक्समध्ये ल्युपिन, टाटा मोटर्स, कोल इंडिया, सन फार्मा, एशियन पेंट्स आदी जवळपास दोन टक्क्यांपर्यंत घसरले. तर व्यवहारातील तेजीमुळे भारती एअरटेल, अ‍ॅक्सिस बँक, टीसीएस, टाटा स्टील आदी दिवसअखेरही जवळपास या प्रमाणापर्यंत वाढले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये भांडवली वस्तू, वाहन, आरोग्यनिगा आदी घसरणीच्या तर पोलाद, स्थावर मालमत्ता, बँक आदी तेजीच्या यादीत राहिले. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकांमध्ये तेजी नोंदली गेली.

कंपन्यांच्या चांगल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या सत्राची उत्साहवर्धक सुरुवात झाली, तर दिवसअखेर हा उत्साह मावळत जात अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या बैठकीबाबतच्या चिंतेमुळे निर्देशांकात किंचितशा घसरणीवर तो विसावला.  – विनोद नायर, जिओजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे संशोधनप्रमुख

सालासार टेक्नो इंजिनीअरिंगचा दमदार मुहूर्त

  • निर्देशांकांची विक्रमी हालचाल नोंदविणाऱ्या भांडवली बाजारातील प्रवेश सालासार टेक्नो इंजिनीअरिंगच्या पथ्यावर पडला. राजस्थानस्थित पायाभूत सेवा क्षेत्रातील सालासारची नोंदणी कंपनीने जारी केलेल्या १०८ रुपये किमतीपेक्षा दुपटीने सूचिबद्धता झाली. तब्बल १५१.९४ टक्के अधिक भाव मिळत समभाग मुंबई शेअर बाजारात दिवसअखेर २७२.१० वर सूचिबद्ध झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील त्याचा मंगळवारचा प्रवास २५० रुपयांपुढेच सुरू झाला होता. जुलैच्या सुरुवातीला प्रारंभिक खुली भागविक्री राबविणाऱ्या सालासारला २७३ पट प्रतिसाद मिळाला होता. कंपनीने यामार्फत ३५.८६ कोटी या माध्यमातून उभारले होते.

एसआयएसची प्रति समभाग ८०५ ते ८१५ रुपयांनी भागविक्रीची घोषणा

  • सुरक्षाविषयक उपकरण निर्मिती करणाऱ्या सिक्युरिटीज अ‍ॅण्ड इंटेलिजेन्स सव्‍‌र्हिसेसने (एसआयएस) मंगळवारी प्रारंभिक भागविक्री प्रक्रिया जाहीर केली. प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्याचे ५१.२० लाख समभाग विक्री खुले होणार आहेत. कंपनी याद्वारे ३६२ कोटी रुपये उभारणार आहे. त्यासाठी प्रति समभाग ८०५ ते ८१५ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. प्रारंभिक खुल्या भागविक्री प्रक्रियेनंतर कंपनीची सूचिबद्धता मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात होणार आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय सिंह, समूह व्यवस्थापकीय संचालक रुतुराज सिन्हा व अध्यक्ष रवींद्र किशोर सिन्हा आदी प्रक्रिया घोषणेप्रसंगी उपस्थित होते.