हिंदू नववर्षांच्या पहिल्याच दिवशी प्रमुख निर्देशांकांमध्ये तेजी नोंदवीत गुंतवणूकदारांनी नव्या संवत्सराचे स्वागत केले. यामुळे सलग पाचव्या व्यवहारात सेन्सेक्स तेजीत राहिला. तर निफ्टीनेही ८ हजारांचा टप्पा शुभमुहूर्ताला गाठला.
नव्या संवत्सराच्या मुहूर्ताच्या सौद्यांना सायंकाळी ६.१५ वाजता प्रारंभ झाला. सुरुवातीला सेन्सेक्स तब्बल १४३ अंशांनी उंचावत २६,९३०.२३ ला पोहोचला. बुधवारच्या तुलनेत ही वाढ ०.५३ टक्के होती. याच वेळी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ३५.८५ अंश वाढ नोंदवीत ८ हजारांच्या वर ८,०३१.३५ने सुरुवात केली.
अवघ्या सव्वा तासात झालेल्या व्यवहाराच्या सुरुवातीचा निर्देशांकाचा कल मोठय़ा वाढीचा असला तरी सत्रअखेर त्यातील दरी कमी होत गेली. मात्र दोन्ही निर्देशांक बुधवारच्या तुलनेत वधारणेसहच बंद झाले. सत्रात सेन्सेक्स २६,९३०.२३ पर्यंत गेला होता. तर निफ्टी ८ हजारांच्याच वर, ८,०३१.७५ पर्यंत पोहोचला होता. मुहूर्त व्यवहारअखेर तो ८ हजारांवरच कायम राहिला.
सुमारे सव्वाशे वर्षेहून जुना फोर्ट येथील मुंबई शेअर बाजारातील जिजिभाई टॉवरमधील सायंकाळचे वातावरण एकदम उत्साहाचे होते. गुंतवणूकदार, दलाल सहकुटुंब पारंपरिक पोशाखात वावरत होते. हिंदू नववर्ष प्रारंभाला गुंतवणूकदारांकडून नवीन खाती, नवे व्यवहार सुरू करण्याबरोबरच निवडक समभाग खरेदीची मागणी नोंदली जात होती, असे दलालांनी स्पष्ट केले.
तेल व वायू, भांडवली वस्तू, ग्राहकपयोगी वस्तू, पोलाद, बँक या गेल्या काही दिवसातील मागणी असलेल्या समभागांचा कल गुरुवारीही कायम राहिला. सलग चार व्यवहारांत सेन्सेक्स सुमारे ७८७.८९ अंशांनी वधारला आहे. त्यामुळे त्याचा प्रवास २६,५००च्या पुढे गेला. सरत्या २०७०मध्ये सेन्सेक्समध्ये ५,५९०.४२ अंशांची भर पडली आहे. संवत्सर २०७०मध्ये गुंतवणूकदारांची मालमत्ता २५ लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. गेल्या पाच संवत्सर वर्षांतील ती सर्वोत्तम ठरली आहे. यापूर्वी संवत्सर २०६५मध्ये (२००९) सेन्सेक्समध्ये ८,८१३.२६ अंशांनी उंचावला होता.
आधीच्या वर्षांपेक्षा त्यातील वाढ तब्बल १०३.५७ टक्के होती. तर निफ्टीने गुरुवारी संपलेल्या संवत्सरात १,६८८.७० अंश वाढ नोंदविली आहे. दोन्ही प्रमुख निर्देशांक २६ टक्क्यांहून अधिक वाढ या कालावधी नोंदविली आहे. गुरुवार व शुक्रवारी दीपावलीनिमित्ताने भांडवली बाजारात व्यवहार नाहीत. लक्ष्मीपूजनानिमित्ताने गुरुवारी सायंकाळी ६.१५ ते ७.३० दरम्यान केवळ मुहूर्ताचे व्यवहार झाले.
गेले संवत्सर हे खूपच आव्हानात्मक राहिले आहे. तुलनेत नव्या संवत्सराची सुरुवात चांगली झाली. २०७० मध्ये मुंबई शेअर बाजाराच प्रमुख सेन्सेक्स २६ टक्क्य़ांनी उंचावला. तर मिड व स्मॉल कॅप अनुक्रमे ५१ व ७६ टक्क्य़ांनी वधारले. केंद्रात व राज्यात एका राजकीय पक्षाला बहुमत देणारा कल बाजारालाही उंचावणारा ठरला आहे. पाठोपाठ आता आर्थिक सुधारणांची गतीही वातावरणात परिणामकारक ठरू लागली आहे. नव्या २०७१ संवस्तराबाबत मात्र खूपच आशा आहे. स्थानिक पातळीवर आर्थिक सुधारणा तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या त्या देशाद्वारे, त्यांच्या मध्यवर्ती बँकांद्वारे आर्थिक सहकार्याचा हात विकासात भर घालणारा ठरेल.
दिपेन शहा, प्रमुख, (खासगी ग्राहक समूह विश्लेषक), कोटक सिक्युरिटिज.

कंपन्यांच्या सूचिबद्धतेसाठी बडे उद्योगपती पाहण्याची सवय असलेल्या जिजिभाई टॉवरमध्ये गुरुवारी अभिनेत्री काजल अगरवाल हिने नव्या संवत्सराचा मुहूर्त डंका वाजविला आणि मग उपस्थित गुंतवणूकदारांनीही तिची छबी टिपली.