आयटीसी, रिलायन्स आपटल्याने विक्रमी शिखरावरून निर्देशांकाची ३५० अंशांनी घसरगुंडी

सप्ताहारंभी विक्रमी टप्प्याला पोहोचलेल्या भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी मंगळवारी नफेखोरीचा अवलंब केला. परिणामी एकाच सत्रात वर्षांतील सर्वात मोठी म्हणजे तब्बल ३५० हून अधिक अंश घसरण नोंदविल्याने सेन्सेक्स ३२ हजाराच्या आत स्थिरावला. तर ८८.८० अंश घसरणीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९,८२७.१५ पर्यंत पोहोचला.

मंगळवारी दिवसअखेर ३६३.७९ अंश घसरणीसह मुंबई निर्देशांक  ३१,७१०.९९ वर आला. २०१७ मधील सर्वात मोठी घसरण मंगळवारी नोंदली गेली. दिवसअखेर त्यात काहीसा सुधार दिसला असला तरी सोमवारच्या तुलनेत मात्र लक्षणीय घसरण नोंदली गेली. निफ्टीनेही मंगळवारी ९,९०० चा स्तर सोडला.

सप्ताहारंभीच्या व्यवहारात सेन्सेक्स ३२,१३१.९२ पर्यंत झेपावल्यानंतर सोमवारअखेर ३२,०७४.७८ वर थांबला होता. तर निफ्टीनेही सोमवारी ऐतिहासिक उच्चांक गाठला होता.

मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाने सोमवारी त्यांचा स्थापनेतील सर्वोच्च टप्पा गाठला होता. मंगळवारचे व्यवहार सुरू होण्यापूर्वीच गुंतवणूकदारांनी वरच्या टप्प्याला पोहोचलेल्या बाजारात नफेखोरी करण्याचे धोरण आखल्याचे स्पष्ट झाले. सत्राची सुरुवातच घसरणीने झाली. दुपारी सेन्सेक्स ३१,९११.६१ या वरच्या टप्प्यावर पोहोचल्यानंतर त्याचा सत्रातील तळ ३१,६२६.४४ नोंदला गेला. मुंबई निर्देशांकाची यापूर्वीची मोठी सत्रआपटी २१ नोव्हेंबर रोजी नोंदली गेली. या वेळी सेन्सेक्स एकाच व्यवहारात ३८५.१० अंशाने आपटला होता.

९,८३२.७० या किमान स्तरावर व्यवहाराला सुरुवात करणाऱ्या निफ्टीचा व्यवहारातील सर्वोच्च टप्पा ९,८८५.३५ राहिला. तर सत्रतळ ९,७९२.०५ नोंदला गेला. दिवसअखेरही त्याला ९,९०० नजीकचा टप्पा राखता आला नाही.

आठवडय़ाच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रात आयटीसीसह रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बँक, पॉवर ग्रिड, एचडीएफसी लिमिटेड, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, एअरटेल, कोटक महिंद्र बँक, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र आदी घसरले.

तर दुपारच्या सेन्सेक्समधील तेजीमुळे सत्रअखेरही एशियन पेंट्स, सन फार्मा, अ‍ॅक्सिक बँक, ओएनजीसी, हीरो मोटोकॉर्प, डॉ. रेड्डीज्, टाटा स्टील हे मूल्यवाढीच्या क्रमवारीत राहिले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता, ग्राहकोपयोगी वस्तू, तेल व वायू, सार्वजनिक उपक्रम आदी एक टक्क्यापर्यंत घसरले. तर माहिती तंत्रज्ञान, वाहन, आरोग्यनिगा आदी निर्देशांक ०.२४ टक्क्यापर्यंत वाढले. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे ०.६० व ०.५८ अंशांनी घसरले.

घसरण नेमकी कशामुळे?

एकटय़ा आयटीसीकडून ४०० अंशांचा खड्डा

गत २० वर्षांतील सर्वात मोठी १४ टक्क्य़ांची घसरगुंडी आयटीसी लिमिटेडच्या समभागाने मंगळवारी नोंदविली. जीएसटी परिषदेने सिगारेटवर अधिभार वाढविल्याच्या नकारात्मक परिणाम समभागाच्या विक्रीत आणि मूल्य घसरणीत दिसून आला. ‘सेन्सेक्स’  हा निर्देशांक निर्धारीत करणारा आयटीसी हा महत्त्वाचा समभाग असल्याने, एकटय़ा त्याच्या घसरणीने सेन्सेक्सने ४०० अंश गमावले. निर्देशांकातील एचडीएफसी, भारती एअरटेल, टीसीएस, इन्फोसिस या समभागांनी वाढ दर्शविल्याने सेन्सेक्सची तूट ३५० अंशांच्या मर्यादेपर्यंत राखणे शक्य झाले.

एलआयसीला ८,१५० कोटींचा दणका

आयटीसीच्या समभागाच्या घसरगुंडीने त्या कंपनीतील मोठा भागधारक या नात्याने भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी)ला ८,१५२ कोटी रुपयांच्या नुकसानीचा दणका सोसावा लागला. आयटीसीचे बाजारमूल्य मंगळवारच्या घसरणीतून तब्बल ५०,०४६ कोटी रुपयांनी घटून ३.४६ लाख कोटींवर उतरले. एलआयसीचे आयटीसीमध्ये १६.२९ टक्के (३० जून २०१७ अखेर) भागभांडवल आहे. एलआयसीसह

देशांतर्गत विमा कंपन्यांना मंगळवारच्या या घसरणीने एकंदरीत ११,२५० कोटी रुपयांचे नुकसान झाले.