सेन्सेक्समध्ये ३७४ अंश घसरण ’ निफ्टी ८,८०० च्या खाली ’ पंधरवडय़ातील मोठी सत्रघसरण

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची समीप येऊन ठेपलेली निवडणूक आणि तेल उत्पादक देशांची होऊ घातलेली बैठक या पाश्र्वभूमीवर जगभरातील भांडवली बाजारातील पडझडीच्या पावलांवर पाऊल ठेवत येथील प्रमुख निर्देशांकांनी सप्ताहरंभी मोठी आपटी नोंदविली. एकाच व्यवहारातील गेल्या पंधरवडय़ातील सर्वात मोठी आपटी नोंदविताना सेन्सेक्ससह निफ्टी त्याच्या उल्लेखनीय टप्प्यांवरून माघारी फिरले. गुंतवणूकदारांनी खरेदीकडे पाठ फिरविल्यामुळे प्रमुख निर्देशांक महिन्याभराच्या तळात येऊन ठेपले.

३७३.९४ अंश घसरणीसह सेन्सेक्स २८,२९४.२८ वर तर १०८.५० अंश नुकसानासह निफ्टी ८,७२३.०५ पर्यंत खाली आला.  सेन्सेक्सची सोमवारची आपटी ही १२ सप्टेंबर रोजीच्या तर त्याचा दिवसअखेरचा बंद स्तर हा २९ ऑगस्टनंतरचा किमान ठरला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने सोमवारच्या शतकी घसरणीमुळे त्याचा ८,८०० चाही स्तर सोडला.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आता काही दिवसांवरच आली आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमालीने खाली येत असताना प्रमुख तेल उत्पादकांची बैठक चालू आठवडय़ात होऊ घातली आहे. त्यातच रिझव्‍‌र्ह बँकेच्या पुढील आठवडय़ात होणाऱ्या व्याजदर पतधोरणाकडे तमाम गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर चालू आठवडय़ात येत्या गुरुवारी महिन्यातील वायदापूर्तीचा अखेरचा दिवस आहे.

नव्या सप्ताहाची सुरुवात आशियातील प्रमुख बाजारांनी मोठय़ा घसरणीने केली. दिवसअखेरही तेथील बाजार शुक्रवारच्या तुलनेत मोठय़ा फरकाने खाली आले होते. तर युरोपीय बाजारातही सुरुवात घसरणीनेच झाली. हाच कित्ता येथील मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजारातही गिरविला गेला.

सेन्सेक्सने गेल्या आठवडय़ात तेजी नोंदविताना त्याचा गेल्या दीड वर्षांतील सर्वोत्तम प्रवास नोंदविला होता. याचाच लाभ गुंतवणूकदारांनी सोमवारी करून घेतला. प्राप्त झालेल्या अधिक मूल्यावर समभागांची जोरदार विक्री करतण्याचे धोरण त्यांच्याकडून अवलंबिले गेले. परिणामी, सेन्सेक्स व निफ्टीत सोमवारी एक टक्क्य़ापेक्षाही अधिक अंश आपटी नोंदली गेली.

जागतिक घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर इतर निर्देशांकांप्रमाणेच येथील निर्देशांकांनीही कामगिरी बजाविल्याचे निरिक्षण जिओजित बीएनपी पारिबा फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदविले आहे. तर जिओजितचेच आनंद जेम्स यांनी सोमवारच्या भांडवली बाजारातील व्यवहारात विदेशी गुंतवणूकदार संस्थांची भूमिका महत्त्वाची राहिल्याचे नमूद केले आहे.सेन्सेक्समधील ३० पैकी ओएनजीसी हा सर्वाधिक, ३.८४ टक्क्य़ांसह मूल्यऱ्हास नोंदविणारा समभाग ठरला.

तर टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, गेल, भारती एअरटेल, आयटीसी, महिंद्र अँड महिंद्र, हीरो मोटोकॉर्प, हिंदुस्थान यूनिलिव्हर, लार्सन अँड टुब्रो यांच्या मूल्यांमध्येही ३ टक्क्य़ांपर्यंतची घसरण झाली.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावप मालमत्ता हा २ टक्क्य़ांसह घसरला. तर वाहन, पायाभूत सेवा, बँक, तेल व वायू, पोलाद आदी निर्देशांक १.७२ टक्क्य़ांपर्यंत घसरले.

मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांक अनुक्रमे ०.५५ व ०.५३ टक्क्य़ांसह घसरले.आशियाई बाजारात जपानचा निक्केई १.२५ टक्क्य़ांसह शांघाय कंपोझिट १.७६ टक्के तर हँग सेंग १.५८ टक्क्य़ांनी खाली आले. युरोपातील लंडनचा एफटीएसई (१.२२%), फ्रांसचा कॅक-३० (१.८३%), जर्मनीचा फ्रँकफर्ट (१.४९%) हेही सुरुवातीच्या प्रवासात घसरण नोंदवित होते.

मंदीतही समभाग तेजी..

सेन्सेक्समध्ये मोठी घसरण होऊनही कोल इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीजसारखे समभाग तेजीच्या यादीत राहिले. त्यांचे मूल्य एक टक्क्य़ापर्यंत वाढले. ल्युपिन, डॉ. रेड्डीज्, टीसीएसही वाढले. रिलायन्सने तर १,१२८.९० हा त्याचा गेल्या सात वर्षांचा उच्चांक दरही प्राप्त केला. मुंबई निर्देशांकातील पाच समभाग तेजीवाले ठरले.

सेन्सेक्स तसेच अनेक उल्लेखनीय समभागांमध्ये आपटी नोंदली जात असतानाच काही समभागांमध्ये लक्षणीय वाढ याच सत्रात राखली गेली. यामध्ये अ‍ॅडलॅब्स एंटरटेनमेंट, वर्धमान टेक्सटाईल, मार्क्‍सन्स फार्मा यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. अ‍ॅडलॅब्जचा समभाग १२ टक्क्य़ांनी उंचावत ११२.२० रुपयांवर स्थिरावला. तर वर्धमान ३ टक्क्य़ांनी वाढून १,०७१.०५ पर्यंत पोहोचला.

बैठकीपूर्वी तेल दरवाढ!

चालू आठवडय़ात प्रमुख तेल उत्पादक देशांची बैठक होत असतानाच आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेल दरांनी पुन्हा उसळी घेणे सुरू केले आहे. लंडनच्या बाजारात ब्रेंट क्रूडचे पिंपासाठीचे दर सोमवारी ४६ डॉलरच्या वर प्रवास करत होते. अतिरिक्त इंधन पुरवठय़ामुळे खनिज तेलाचे दर घसरत होते. ही स्थिती आणखी काही महिने राहण्याची भीती यापूर्वी व्यक्त केली गेली आहे.

रुपयात वाढ

डॉलरच्या तुलनेत रुपया सप्ताहारंभी ४ पैशांनी वाढला. परकी चलन विनियम मंचावर रुपया ६६.६१ वर पोहोचला. भांडवली बाजारातील पडझडीमुळे बँका तसेच निर्यातदारांनी अमेरिकी चलनाची विक्री केल्याने दबाव रुपयावर निर्माण झाला.

धातू दर दिलासा

मौल्यवान धातूंच्या दरातील गेल्या काही व्यवहारातील दरचकाकी सोमवारी फिकी पडली. सोने तसेच चांदीचे दर सप्ताहारंभीच काही फरकाने खाली आले.