मुंबई निर्देशांकाची दीड महिन्यातील सर्वोत्तम सत्र झेप

नव्या आठवडय़ाची सुरुवातच मोठय़ा निर्देशांक वाढीसह सुरू झाली. मुंबई निर्देशांकाने एकाच व्यवहारात तब्बल त्रिशतकी झेप घेत गेल्या सहा आठवडय़ातील सर्वोत्तम सत्रवाढ सोमवारी नोंदविली. तर जवळपास शतकी निर्देशांक वाढीने निफ्टी ९,२०० च्या पुढे स्थिरावला.

आंतरराष्ट्रीय घडामोडींना सकारात्मक घेत येथील भांडवली बाजारांनी एप्रिलमधील शेवटच्या आठवडय़ाची सुरुवात सोमवारी निर्देशांक वाढीसह झाली. त्यातच रिलायन्स इंडस्ट्रिजच्या तिमाही नफावाढ निकालाचेही बाजारात स्वागत झाले.

डॉलरच्या तुलनेत रुपयाही नव्या सप्ताहारंभीच अधिक भक्कम झाला.

२९०.५४ अंश वाढीसह सेन्सेक्स २९,६५५.८४ पर्यंत वाढला. तर ९८.५५ अंशवाढीसह निफ्टी ९,२१७.९५ वर स्थिरावला. मुंबई निर्देशांकाची सोमवार सत्रअखेरचा स्तर हा ११ एप्रिलनंतरचा सर्वोत्तम ठरला. तर त्याचा सोमवारचा प्रवास हा गेल्या दीड महिन्यांतील सवरेतम ठरला.

मुंबई निर्देशांकाचा सोमवारचा प्रवास २९,३९२.९९ ते २९,६८१.३३ तर निफ्टीचा ९,१३०.५५ ते ९,२२५.४० दरम्यान राहिला. सेन्सेक्सने गेल्या सप्ताहाची अखेर ५७.०९ अंश घसरणीने केली होती. रिलायन्सच्या रूपात येथील कंपन्यांनी गेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांची सुरुवात चांगली केल्याचे मानत गुंतवणूकदारांनी बाजारात समभाग खरेदीचे धोरण अवलंबिले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता निर्देशांक सर्वाधिक, ३ टक्क्य़ांसह आघाडीवर राहिला. तर भांडवली वस्तू, बँक, वाहन, पोलाद, तेल व वायू, आरोग्यनिगा निर्देशांकांमध्येही वाढ नोंदली गेली.

सेन्सेक्समध्ये गेल, अ‍ॅक्सिस बँक, लार्सन अँड टुब्रो, मारुती सुझुकी, एचडीएफसी लिमिटेड, अदानी पोर्ट्स, स्टेट बँक, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, ओएनजीसी, बजाज ऑटो, टीसीएस, आयटीसी आदींचे मूल्य ३.१७ टक्क्य़ांपर्यंत वाढले.

मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे ०.९५ व ०.८२ टक्क्य़ांपर्यंत वाढले. मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक जवळपास एक टक्क्य़ांनी वाढला.

फ्रान्सच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे आशियातील अनेक बाजारांनी स्वागत केले. जपान, हाँग काँग, चीन येथील निर्देशांक वाढते राहिले. तसेच युरोपातील प्रमुख निर्देशांकांमध्येही भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपापर्यंत ४ टक्क्य़ांपर्यंत वाढ नोंदली जात होती.

बाजार भांडवलांमध्ये रिलायन्स अव्वल; चार वर्षांनी टीसीएसला मागे टाकले

सेन्सेक्समधील बाजार भांडवलांमध्ये गेल्या आठवडय़ात वरचढीची स्पर्धा निर्माण करणाऱ्या रिलायन्स – टीसीएसमध्ये सोमवारी अखेर वाढीव नफ्यातील वित्तीय निष्कर्ष जाहीर करणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचाच विजय झाला. जानेवारी ते मार्च २०१७ दरम्यान दुहेरी अंकातील नफावाढीची नोंद करणाऱ्या रिलायन्सचे बाजार भांडवल नव्या आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी सर्वोत्तम राहिले. यामुळे तब्बल चार वर्षांनंतर रिलायन्सला याबाबत स्पर्धक टीसीएसवर मात करता आली. शुक्रवारच्या तुलनेत समभाग मूल्यात एक टक्क्य़ाची वाढ राखूनही रिलायन्सचे बाजार भांडवल मात्र ४.६० लाख कोटी रुपयांवर गेले. टीसीएसच्या ४.५८ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत रिलायन्सचे सोमवार सत्रअखेरचे एकूण बाजार भांडवल १,५८६.४३ कोटी रुपयांनी अधिक होते.

रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँकेच्या समभागांचे मूल्य वधारले

सोमवारी मार्च २०१७ अखेरच्या तिमाहीतील नफ्याचे वित्तीय निकाल जाहीर करणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग सोमवारी १.१९ टक्क्य़ांसह वाढला. गेल्या आठवडय़ात १८.२ टक्के तिमाही नफ्यातील वाढ नोंदविणाऱ्या एचडीएफसी बँकेचा समभाग सोमवारीही वाढता राहिला. बँक समभागाचे मूल्य आठवडय़ाच्या पहिल्या सत्रात २.४१ टक्क्य़ांनी वाढले.

समभाग       वाढ

(नफा         वाढ)

रिलायन्स इंड.   रु.१,४१६.४०  +१.१९%

(रु.८,०४६कोटी +१२.३%)

एचडीएफसी बँक  रु. १,५३२.७५ +२.४१%

(रु.३,९९० कोटी  +१८.२%)