• ४४० अंश वाढीसह वर्षांतील सर्वोच्च टप्प्यावर
  • निफ्टीकडून सव्वा वर्षांची अव्वल पातळी सर

दमदार वाढ नोंदविणाऱ्या प्रमुख जागतिक बाजारांना साथ देत मंगळवारी सेन्सेक्स व निफ्टी या प्रमुख निर्देशांकांनीही त्यांचे अनोखे टप्पे गाठले. एकाच सत्रात तब्बल ४४०.३५ अंश वाढ नोंदवीत मुंबई निर्देशांक २८,३४३.०१ या गेल्या १३ महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला. तर १३६.९० अंश वाढीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने १६ महिन्यांनंतरच प्रथमच ८,७४४.३५ ही पातळी गाठली.

अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हद्वारे व्याजदर तूर्त टाळली गेल्याचा नि:श्वास आशियाई तसेच युरोपीय बाजारात गुंतवणूकदारांनी टाकला. त्याचे पडसाद अर्थातच स्थानिक बाजारात स्वाभाविकपणे उमटले. रिझव्‍‌र्ह बँकेच्या भारताच्या विकास दराबाबतच्या अंदाजाची प्रतिक्रिया विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून खरेदीच्या रूपाने नोंदली गेली. गेल्या काही सत्रांपासून सावध असलेल्या विदेशी गुंतवणूकदारांनी मंगळवारी अकस्मात मोठय़ा खरेदीचे व्यवहार नोंदविल्याचे जिओजित बीएनपी पारिबास फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी सांगितले. नव्या सप्ताहाची सुरुवात करताना सोमवारी निर्देशांक सलग दोन व्यवहारांतील घसरणीतून सावरलेला दिसले. तर मंगळवारच्या सत्राची २८ हजारांवर सुरुवात करणारा सेन्सेक्स व्यवहारात २८,४७८.०२ पर्यंत झेपावला. तर त्याचा सत्रातील तळही २८ हजारांच्या वरच राहिला.

दिवसअखेर दीड टक्क्यांहून अधिक निर्देशांक वाढ नोंदविणारा सेन्सेक्स मंगळवारच्या तेजीमुळे २३ जुलै २०१५ रोजीचा २८,३७०.८४ या उच्चांकी टप्प्यानजीक पोहोचला. तर याच प्रमाणात सोमवारच्या तुलनेत व्यवहारअखेर वाढ नोंदविणारा निफ्टी १५ एप्रिल २०१५ रोजीच्या ८,७५०.२० च्या उच्चांकापाशी स्थिरावला आहे.

बाजारात वाहन, माहिती तंत्रज्ञान, भांडवली वस्तू, बँक, वित्त कंपन्या, पोलाद, ग्राहकोपयोगी वस्तू, तेल व वायू, ऊर्जा, स्थावर मालमत्ता, पायाभूत, आरोग्यनिगा, सार्वजनिक उपक्रम आदी जवळपास सर्वच निर्देशांक तेजीत राहिले. १.८१ टक्क्यांसह वाहन निर्देशांक तेजीत आघाडीवर राहिला. केवळ दूरसंचार निर्देशांक (-१.२०%) नकारात्मक स्थितीत स्थिरावला.

सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ भारती एअरटेल घसरणीच्या (-२.९२%) यादीत राहिला. मुंबई निर्देशांकातील एशियन पेंट्स, बजाज ऑटो, मारुती सुझुकी, गेल, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, विप्रो आदी उर्वरित २९ समभाग ३.२० टक्क्यांच्या मूल्यवाढीसह झेपावले.

बाजारमूल्य ११०.७० लाख कोटींवर

मुंबई शेअर बाजाराचे बाजारमूल्य मंगळवारी सर्वोच्च टप्प्यावर पोहोचले. बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण मूल्य ११०.७० लाख कोटी रुपयांवर गेले. यामुळे गुंतवणूकदारांची मालमत्ताही एकाच व्यवहारात १.३९ लाख कोटी रुपयांनी वाढली. सेन्सेक्सने २८,४७८.०२ या गेल्या वर्षांतील उच्चांकाला गवसणी घातली.  देशातील सर्वात जुना मुंबई शेअर बाजार हा जगातील अव्वल १० बाजारांमध्ये गणला जातो.

सर्वोच्च मूल्य प्राप्त करणाऱ्या अव्वल पाच कंपन्या :

  • टीसीएस रु. ५.०२ लाख कोटी रुपये
  • रिलायन्स इंडस्ट्रीज रु. ३.४५ लाख कोटी रुपये
  • एचडीएफसी बँक रु. ३.२२ लाख कोटी रुपये
  • आयटीसी रु. ३.११ लाख कोटी रुपये
  • इन्फोसिस रु. २.३९ लाख कोटी रुपये

विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी मंगळवारी बाजारात खरेदीचा सपाटा लावला. यामुळे बाजाराला वरच्या टप्प्यावर पोहोचता आले.

  • आनंद जेम्स, मुख्य बाजार विश्लेषक, जिओजित बीएनपी पारिबास फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस.