निफ्टीची ७,९६२ ला गवसणी; चार महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर

सलग दोन व्यवहारांत घसरण नोंदविल्यानंतर भांडवली बाजाराने मंगळवारी अचानक मोठी निर्देशांक झेप घेतली. एकाच व्यवहारात तब्बल ३०० हून अधिक अंश वाढ नोंदवीत सेन्सेक्स २६ हजार या त्याच्या गेल्या चार महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला. तर शतकी निर्देशांक वाढीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीलाही त्याचा गमावलेला ७,९०० चा स्तर गवसला.

भांडवली बाजार मंगळवारी प्रमुख जागतिक निर्देशांकाच्या तेजीवर स्वार झाले. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात नव्याने उंचावलेल्या खनिज तेलाच्या दराचे येथील बाजारातही स्वागत झाले. डॉलरच्या तुलनेत भक्कम होऊ पाहणाऱ्या रुपयाची दखलही बाजाराने सव्वा टक्क्यांहून अधिकच्या निर्देशांक वाढीने नोंदविली.

गेल्या सलग दोन व्यवहारांत भांडवली बाजाराने घसरणीचा प्रवास नोंदविला आहे. अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्ह, बँक ऑफ जपान यांच्या चालू आठवडय़ातील व्याजदर निश्चितीच्या बैठका समीप येत असताना आंतरराष्ट्रीय बाजाराने वाढीचा फेर धरला आहे. परिणामी, येथेही मुंबई निर्देशांकाला त्याचा २६ हजारांचा टप्पा गेल्या काही महिन्यांनंतर पुन्हा गाठता आला, तर निफ्टीला त्याचा ८,००० नजीकचा स्तर अनुभवता आला.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही मंगळवारच्या सत्रात ७,८२२.५५ ते ७,९७३.०५ असा वरचा प्रवास केला. सत्रअखेर निफ्टीला ७,९६२.६५ या ८,००० नजीकच्या टप्प्यावर थांबावे लागले.

सेन्सेक्समध्ये मारुती सुझुकी, टाटा स्टील, सिप्ला, भेल, ल्युपिन, अ‍ॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, आयटीसी, एचडीएफसी बँक, स्टेट बँक, टीसीएस, एशियन पेंट्स, इन्फोसिस, एल अ‍ॅण्ड टी यांचे समभाग मू्ल्य वाढले. तर मुंबई निर्देशांकातील ३० पैकी अदानी पोर्ट्स, हिरो मोटोकॉर्प आणि डॉ. रेड्डीजच्या समभागाला घसरणीला सामोरे जावे लागले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बँक सर्वाधिक, २ टक्क्यांसह वाढला, तसेच पोलाद, माहिती तंत्रज्ञान, वाहन निर्देशांकांमध्येही वाढ नोंदली गेली. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक पाऊण टक्क्यापर्यंत वाढले होते. थेट विदेशी गुंतवणूक बंदीमुळे सिगारेट उत्पादक कंपन्यांच्या समभागांवर बाजारात मंगळवारी विशेष हालचाल नोंदली गेली.

‘सेन्सेक्स’चे २०१६ मधील शिखर

सेन्सेक्सने यापूर्वीच्या दोन व्यवहारांत २०० हून अधिक अंशांची आपटी नोंदविली आहे. आठवडय़ातील दुसऱ्या सत्राची बाजाराची सुरुवात काहीशी नरम झाली. १३० अंश घसरणीसह सेन्सेक्स २५,५०० वर येऊन ठेपला होता, मात्र मंगळवारी व्यवहाराच्या मध्यापर्यंत त्यात २६,०४९ पर्यंत वाढ होत गेली. दिवसअखेर वरच्या टप्प्यावरच तिने विश्राम घेतला थांबली. मुंबई निर्देशांकाचा वर्ष २०१६ नंतरचा सर्वोच्च स्तर राहिला आहे. निफ्टी मात्र वर्षांतील उच्चांकी स्तरापासून किंचित खाली आहे.