तीन महिन्यांनंतर पुन्हा महागाईने भडक्याच्या दिशेने फेर धरल्याची चिंता भांडवली बाजारातही सप्ताहारंभी स्पष्टपणे दिसून आली. मंगळवारी सकाळ जाहीर झालेल्या मार्चमधील वाढलेल्या घाऊक किंमत निर्देशांकापोटी सेन्सेक्स १४४.०३ अंश घसरणीने २२,५०० च्याही खाली येत २२,४८४.९३ वर स्थिरावला. निफ्टीनेही सप्ताहाच्या पहिल्या दिवशीच्या व्यवहारात ४३.२० अंश घट नोंदवित ६,७३३.१० वर थांबणे पसंत केले.
सोमवारच्या सुटीनंतर मंगळवारी सेन्सेक्सने तेजी-मंदी अनुभवली. दिवसभरात २२,७३७.३१ अंशापर्यंत झेप घेतल्यानंतर नफेखोरीने मुंबई निर्देशांकाला व्यवहारात लगेच २२,४१६.२४ या दिवसाच्या तळालाही आणून सोडले. मार्चमधील तीन महिन्यांच्या उच्चांकाला पोहोचलेल्या घाऊक किंमत निर्देशांकाने गुंतवणूकदारांमध्ये चिंता व्यक्त करत त्यांना नफेखोरी करण्यास भाग पाडले.
गेल्या आठवडय़ाची अखेर करताना सेन्सेक्सने शुक्रवारी ८० अंशांची घट नोंदविली होती, तर मंगळवारच्या व्यवहारात २२,७००च्या वरच्या टप्प्यावर असणाऱ्या मुंबई निर्देशांकाचा लाभ उठवत गुंतवणूकदारांनी दिवसअखेपर्यंत समभाग विक्री जारी ठेवली. महागाई वधारल्याने आता तर व्याजदर कपात नाहीच, हे हेरून गुंतवणूकदारांनी सेन्सेक्सला नकारात्मकतेत आणले.
व्यवहारात झेपावलेल्या सेन्सेक्सवर इन्फोसिसच्या सकारात्मक तिमाही वित्तीय निष्कर्षांचा परिणामही जाणवला. इन्फोसिससह एकूणच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील टीसीएस, विप्रो यांचे समभाग मूल्य ४ टक्क्यांपर्यंत उंचावले. सेन्सेक्समध्ये १० समभागांचे मूल्य वधारले, तर बँक क्षेत्रातील समभागांचे मूल्य रोडावले. डिआजिओच्या ‘ओपन ऑफर’च्या प्रस्तावाने युनायटेड स्पिरिटही ११.५८ टक्क्यांनी चमकला.
यूबी समूहाचे विजय मल्ल्या यांची मद्यनिर्मिती कंपनी युनायटेड स्पिरिट्समधील अतिरिक्त २६ टक्के हिस्सा खरेदीमुळे आता ब्रिटनच्या डिआजिओचे वर्चस्व निर्माण झाले आहे. भांडवली बाजारातील व्यवहारादरम्यानच ही घडामोड घडल्याने दिवसअखेर यूनायटेड स्पिरिट्सचा समभाग मुंबई शेअर बाजारात तब्बल ११.५८ टक्क्यांनी उंचावत २,८५३.१५ रुपयांपर्यंत गेला.