प्रतिकूल जागतिक घडामोडींमु़ळे भांडवली बाजारात अस्वस्थता कायम राहण्याची शंका व्यक्त करण्यात आली असली तरी एरवी मेमधील ‘विका आणि दूर रहा’ हे गुंतवणूक धोरण यंदाच्या मेमध्ये दिसणार नाही, असा विश्वास वर्तविला गेला आहे. ऐतिहासिकदृष्टय़ा मे महिना गुंतवणूकदारांसाठी तात्पुरती उसंत घेणारा टप्पा ठरत आला आहे.
मे २०१६ मध्ये आतापर्यंत सेन्सेक्समध्ये ०.६२ टक्के वाढ नोंदली गेली आहे, तर अलिकडच्या काही वर्षांमध्ये मुंबई निर्देशांकाने मे महिन्यात सकारात्मक परतावा दिला आहे. मे २०१५ मध्ये सेन्सेक्स ३ टक्क्यांनी उंचावला होता, तर २०१४ मध्ये मोदी लाटेच्या पाश्र्वभूमीवर तो ८ टक्के बहरला होता. आधीच्या सलग तीन वर्षांत तो नकारात्मक राहिला. २०१२ मधील मेमध्ये सेन्सेक्स ६ टक्क्यांहून अधिक प्रमाणात घसरला होता.
भांडवली बाजारात मेमध्ये विक्री करून गुंतवणूकदार पुन्हा नोव्हेंबरमध्ये खरेदी करतात, असा सर्वसाधारणपणे भारतीय गुंतवणूकदारांचा कल आहे. त्यामुळे मे ते ऑक्टोबर दरम्यान बाजारात अनेकदा अस्थिरता अनुभवली जाते. यंदा मात्र त्याबाबत दलालपेढय़ा, बाजार विश्लेषकांकडून निराळे मत व्यक्त होत आहे.
जागतिक बाजारात मे महिन्याकरिता ‘विका आणि दूर रहा’ हे भांडवली बाजाराबाबतचे धोरण स्वीकाहार्य असले तरी भारतासाठी ते यंदा चांगले नाही, असे जिओजित बीएनपी पारिबास फायनान्शिअल सव्र्हिसेसच्या संशोधन विभागाचे प्रमुख विनोद नायर यांनी म्हटले आहे.
भांडवली बाजाराचा गेल्या सहा वर्षांतील इतिहास पाहिला तर मे ते ऑक्टोबरदरम्यान सरासरी परतावा हा सकारात्मक, ७.३३ टक्के राहिला आहे, असे नमूद करत नायर यांनी भारतासाठी सध्याचा कालावधी हा गुंतवणूकदारांसाठी उत्तम संधी असल्याचे म्हटले आहे.
देशांतर्गत स्थिती सध्या खूपच सकारात्मक असून यंदा होणाऱ्या चांगल्या मान्सूनबाबत गुंतवणूकदारांना खूप आशा आहे, असे नायर म्हणाले. कंपन्यांच्या अधिकच्या मिळकतीबाबतही नायर यांनी आशा व्यक्त केली आहे.
सेन्सेक्सच्या मेमधील गेल्या ११ वर्षांचा कल तपासणाऱ्या मनीपामचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी निर्दोष गौर यांनी सांगितले की, ११ पैकी ६ वर्षांतील मे महिन्यात सेन्सेक्सने सकारात्मक परतावा दिला आहे. तेव्हा बाजारातील विक्रीचे धोरण यंदाही असेल, असे म्हणणे रास्त ठरणार नाही, असेही गौर म्हणाले. अस्थिरता ही बाजाराचा एक भाग असून तो कोणत्याही वर्षांत अथवा कोणत्याही महिन्यात अनुभवला जाणे हे क्रमप्राप्त आहे.
असेच काहीसे मत ट्रेड स्मार्ट ऑनलाइनचे संस्थापक – संचालक विजय सिंघानिया यांनी नोंदविले. ‘विका आणि दूर राहा’ हे बाजाराबाबतचे मे महिन्यातील धोरण नेहमीच असेल असे नाही, असे ते म्हणाले. यंदाच्या मे महिन्याबाबत कोटक सिक्युरिटिजच्या खासगी ग्राहक समूह संशोधन विभागाचे प्रमुख दीपेन शहा यांनी म्हटले आहे की, महिन्याच्या उर्वरित कालावधीत बाजारासाठी कंपन्यांचे तिमाही वित्तीय निष्कर्ष, खनिज तेलाचे दर, डॉलर-रुपयाचा प्रवास याही बाबी लक्षात घ्याव्या लागतील.