दीड महिन्यातील सर्वात मोठी आपटी नोंदवत विक्रमापासून दूर गेलेल्या सेन्सेक्समध्ये बुधवारी अर्धशतकी भर पडल्याने मुंबई निर्देशांक अखेर सावरला. ४८.१४ अंश वधारणेसह सेन्सेक्स २८,३८६.१९ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १२.६५ अंश वाढीमुळे ८,४७५.७५ पर्यंत गेला.e03
मंगळवारच्या व्यवहारात दोन्ही प्रमुख निर्देशांक त्यांच्या सर्वोच्च टप्प्यापासून दूर जाताना दीड महिन्यातील सर्वात मोठी सत्र आपटी नोंदविते झाले होते. गुरुवारी महिन्यातील वायदापूर्तीचा अखेरचा दिवस असताना गुंतवणूकदारांनी मात्र पुन्हा खरेदीचा क्रम अवलंबिला. त्यातच दिल्लीत चटई क्षेत्र प्रमाण वधारल्याने बाजारातील सूचिबद्ध स्थावर मालमत्ता कंपन्यांचे समभाग उंचावले.
एकूण स्थावर मालमत्ता निर्देशांकही सर्वाधिक ४.०३ टक्क्य़ांनी वधारला. अनंत राज, डीएलएफ, यूनिटेक या त्या क्षेत्रातील कंपनी समभागांचे मूल्य ४ ते तब्बल १० टक्क्य़ांपर्यंत वर गेले. सुटय़ा सिगारेटवरील र्निबधाच्या धास्तीने मंगळवारी रसातळाला गेलेला आयटीसीही गुरुवारी सुधारला.
दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपया आठवडय़ातील तिसऱ्या सत्रात २ पैशांनी वधारत ६१.८४ पर्यंत उंचावला. मुंबईच्या सराफा बाजारात सोन्यासह चांदींच्या दरांमध्येही उतरण नोंदली गेली. ६५ रुपये घसरणीमुळे स्टॅण्डर्ड सोन्याचा तोळ्याचा भाव २६,५०० च्या खाली, २६,४०० पर्यंत उतरला. तर किलोचा चांदीचा दर १६० रुपयांनी कमी होत ३७,३९० पर्यंत स्थिरावला.
स्थावर मालमत्ता समभाग भक्कम
अनंत राज     रु. ५४.८०     (+९.७१%)
डीएलएफ    रु. १५१. ९५ (+७.२०%)
ओबेरॉय रिअ‍ॅल्टी    रु. २५६.६०     (+७.१६%)
यूनिटेक    रु. १८.९५     (+४.४१%)
एचडीआयएल    रु. ८१.००     (+३.६५%)
डी बी रिअ‍ॅल्टी    रु. ६४.९०     (+३.४३%)
ओमॅक्स    रु. १२६.७५     (+१.००%)