‘जीएसटी’ बैठक निर्णयाचे बाजारात स्वागत; बँक समभागांनाही मागणी

वस्तू व सेवा कर प्रक्रिया सुलभ करण्याच्या परिषदेच्या रविवारच्या बैठकीचे दमदार स्वागत सप्ताहारंभी भांडवली बाजारात होताना प्रमुख निर्देशांक विक्रमी स्तरावर विराजमान झाले. सोमवारच्या एकाच व्यवहारात सेन्सेक्स २५५.१७ अंशांची झेप घेत थेट ३१,३११.५७ वर पोहोचला. तर ६९.५० अंश वाढ नोंदवित निफ्टी ९,६५७.५५ वर स्थिरावला.

आठवडय़ाच्या पहिल्या दिवशीच्या व्यवहारात ३१,३६२.१५ पर्यंत मजल मारणाऱ्या मुंबई निर्देशांकाने सत्रअखेर व्यवहार समाप्ती करताना ५ जूनच्या ३१,३०९.४९ टप्प्यालाही मागे टाकले. सोमवारी बंदअखेर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही निर्देशांकाचा विक्रम गाठला. व्यवहारात निफ्टी ९,६७३.३० पर्यंत पोहोचला होता. यापूर्वीच्या व्यवहारात दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी घसरण नोंदविली होती.

वस्तू व सेवा कर रचनेत अधिक सुलभता आणणारी परिषदेची बैठक रविवारी झाली. त्याचे तसेच भांडवली बाजार नियामक सेबीद्वारे नजीकच्या दिवसात आणले जाणाऱ्या सुधारणांचेही बाजारात गुंतवणूकदारांनी स्वागत केले. सार्वजनिक बँकांच्या थकित कर्जाची समस्याही निकालात निघत असल्याचे सकारात्मक पडसाद बाजारात उमटले.

सत्राची सुरुवातच तेजीसह करणारे प्रमुख निर्देशांक लगेचच सर्वोच्च टप्प्याला पोहोचले.  दिवसअखेरही निर्देशांकातील वाढ कायम राहिल्याने सोमवारी दोन्ही निर्देशांकांनी त्यांचा ऐतिहासिक टप्पा कायम राखला.

गेल्या सप्ताहात किमान स्तराला पोहोचलेल्या बाजारात कमाईच्या उद्देशाने गुंतवणूकदारांनी सोमवारचे व्यवहार केल्याचे बाजारतज्ज्ञांनी स्पष्ट केले.

सेन्सेक्समध्ये अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड, लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रिज, टीसीएस, हीरो मोटोकॉर्प, आयटीसी, एशियन पेंट्स, सिप्ला, बजाज ऑटो आदी ३ टक्क्य़ांपर्यंत उंचावले.

तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद सर्वाधिक १.८९ टक्क्य़ांनी वाढला. बँक, तेल व वायू, सार्वजनिक उपक्रम, वाहनही निर्देशांक वाढीत सहभागी झाले.

जागतिक बाजारात आशियातील प्रमुख निर्देशांक सप्ताहारंभी तेजीसह बंद झाले. तर युरोपातील बाजारांची नव्या आठवडय़ाची सुरुवातही वाढीसह झाली.

बँक समभाग तेजीत

सोमवारच्या भांडवली बाजाराच्या व्यवहारात विशेषत: बँक समभागांना मागणी राहिली. या क्षेत्रातील स्टेट बँक, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक यांचे मूल्य जवळपास दोन टक्क्य़ापर्यंत वाढले. दिवाळखोर संहिता कायद्यांतर्गत कारवाईचे पाऊल टाकण्याचे निर्देश रिझव्‍‌र्ह बँकेकडून आता वाणिज्यिक बँकांना मिळत आहेत.