वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी दिलेल्या मुदतीत कोणत्याही परिस्थितीत होणार या सरकारच्या इशाऱ्याने गुंतवणूकदारांमध्ये मंगळवारी भांडवली बाजारात धास्ती निर्माण झाली. परिणामी, सप्ताहारंभी प्रमुख निर्देशांकांनी नोंदविलेली वाढ अखेर घसरणीत परिवर्तित झाली.

१४.०४ अंश वाढीने सेन्सेक्स ३१,२९७.५३ वर, तर ४.०५ अंश वाढीमुळे निफ्टी ९,६५३.५० पर्यंत स्थिरावला. सप्ताहारंभीच्या तेजीमुळे दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी सर्वोच्च टप्पा गाठला होता. मंगळवारी मात्र गुंतवणूकदारांनी नफेखोरीचे धोरण अवलंबिले.

सोमवारच्या निर्देशांक वाढीनंतर बाजाराने मंगळवारची सुरुवात तेजीसह केली. व्यवहारात सेन्सेक्स ३१,३९२.५३ पर्यंत झेपावला, मात्र दुपारच्या व्यवहारात तो ३१,२६१.४९ पर्यंत घसरला. दिवसअखेरही मुंबई निर्देशांक सत्राच्या तळात स्थिरावला.

वस्तू व सेवा कर प्रणालीसाठी सज्जता नसल्याची ओरड उद्योगामधून सुरू झाल्यानंतरही विहित वेळापत्रकाप्रमाणे त्याची अंमलबजावणी होणार, याबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. परिणामी, गुंतवणूकदारांनी दिवसअखेर वरच्या टप्प्यावरील मूल्य हेरून समभागांच्या विक्रीचा सपाटा लावला.

बँक समभागांवर मंगळवारी अधिक दबाव दिसून आला. पंजाबमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याने बँकांबाबत चिंता निर्माण झाली. या क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, अ‍ॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्र बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, आंध्रा बँक, यूको बँक, आयडीबीआय बँक, कॅनरा बँक यांचे मूल्य २.७४ टक्क्यांपर्यंत घसरले. स्टेट बँक मात्र अवघ्या ०.५२ टक्क्यांनी वाढला. अन्य तेजीतील समभागांमध्ये टाटा मोटर्स, ओएनजीसी, इन्फोसिस, सिप्ला, टाटा स्टील आदी राहिले. तर सेन्सेक्समधील ३० पैकी पॉवर ग्रिड, एचडीएफसी लिमिटेड, बजाज ऑटो, आयटीसी लिमिटेड, मारुती सुझुकी, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, हिरो मोटोकॉर्प, एनटीपीसी, भारती एअरटेल, सन फार्मा, एशियन पेंट्स आदी २ टक्क्यांपर्यंत घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ऊर्जा, सार्वजनिक उपक्रम आदी ०.२१ टक्क्यांपर्यंत घसरले. तर माहिती तंत्रज्ञान, ग्राहकोपयोगी वस्तू, तेल व वायू, स्थावर मालमत्ता, पोलाद, आरोग्यनिगा, वाहन आदी तेजीच्या यादीत राहिले. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप अनुक्रमे ०.१९ व ०.१६ टक्क्यांनी वाढले.