सलग तिसऱ्या व्यवहारात तेजी नोंदविताना सेन्सेक्स सप्ताहारंभीच गेल्या दोन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. शुक्रवारच्या व्यवहारानंतर वाढीव नफ्याचे वित्तीय निष्कर्ष नोंदविणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रिजचा हा प्रत्यक्ष बाजार सत्रप्रारंभाचा परिणाम होता. कंपनीचे समभाग मूल्य ५.६१ टक्क्य़ांपर्यंत उंचावले.
१५०.३२ अंश वाढीसह मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २७,३६४.९२ वर पोहोचला. तर ३६.९० अंश वाढीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,२७५.०५ पर्यंत गेला.
तिसऱ्या तिमाहीत चिनी अर्थव्यवस्था गेल्या सहा वर्षांत सर्वात संथ राहिल्यानंतर आर्थिक सहकार्याच्या अपेक्षेने एकूण आशियाई बाजारात मात्र संमिश्र वातावरण राहिले.
२७,३०५.६२ अशी तेजीसह नव्या आठवडय़ाची सुरुवात करणारा मुंंबई निर्देशांक व्यवहारात २७,३८७.९१ पर्यंत झेपावला. दिवसअखेरच्या तेजीनंतर सेन्सेक्सने २१ ऑगस्टनंतरचा २७,३६६.०७ या टप्प्यानजीक प्रवास नोंदविला आहे.
सोमवारच्या तेजीमुळे गेल्या तिन्ही व्यवहारातील मिळून मुंबई निर्देशांकात ५८५ अंश वाढ राखली गेली आहे. तर निफ्टीचाही प्रवास ८,२३९.२० ते ८,२८३.०५ असा राहिला.
रिलायन्ससह सेन्सेक्समध्ये भारती एअरटेल, इन्फोसिस, सन फार्मा, डॉ. रेड्डीज, हीरो मोटोकॉर्प आदी समभाग तेजीच्या यादीत राहिले. प्रमुख मुंबई निर्देशांकातील एकूण ३० पैकी १८ समभागांचे मूल्य वाढले. मूल्य घसरलेल्या समभागांमध्ये ओएनजीसी, टाटा मोटर्स, टाटा स्टील, लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो, हिंदाल्को आदींचा समावेश राहिला.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता हा सर्वाधिक २.५७ टक्क्य़ांसह झेपावला. तर तंत्रज्ञान, आरोग्यनिगा, तेल व वायू निर्देशांकही तेजीत राहिले. मुंबई शेअर बाजारातील स्मा२ल व मिड कॅप निर्देशांक अनुक्रमे ०.७७ व ०.६९ टक्क्य़ांनी वाढले. डॉलरच्या तुलनेतील रुपयाची भक्कमताही बाजारात दिवसअखेपर्यंत तेजी राखण्यास कारणीभूत ठरली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या तिमाहीत नफ्याच्या जोरावर एनआयआयटी तसेच एससीएल टेक यांनीही बाजाराच्या वाढीला साथ दिली.