नव्या मोदी सरकारकडून झालेला भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग अद्यापही शमलेला नाही. सलग दुसऱ्या दिवशी नकारात्मक प्रवास नोंदविताना मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख सेन्सेक्स हा निर्देशांक सप्ताहअखेरच्या व्यवहारात तब्बल ३४८.४० अंशांनी आपटला. यामुळे मुंबई निर्देशांक आता २५,०२४.३५ या महिन्याच्या किमान पातळीवर येऊन ठेपला आहे, तर त्याची जवळपास साडेतीनशे अंशांची घसरण ही तब्बल साडेतीन वर्षांनंतरची सुमार साप्ताहिक ठरली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०८.१५ अंश घसरणीसह सप्ताहअखेर ७,५००च्या खाली उतरत ७,४५९.६० वर थांबला.
मुंबई शेअर बाजारातील सप्ताहअखेरची घसरण ही सलग चौथी ठरली. या दरम्यान निर्देशांकाने १,०७५.७३ अंशांचे नुकसान सोसले आहे. गुंतवणूकदारांचीही या रूपाने ५ लाख कोटी रुपयांची मालमत्ता रयाला गेली आहे. भाजपप्रणीत लोकशाही आघाडी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पावर व्यवहारात ४०० अंशांपर्यंत आपटी घेणाऱ्या मुंबई शेअर बाजाराने गुरुवारची अखेर ७०हून कमी अंशांच्या घसरणीने केली होती.
बाजाराच्या एकूण घसरणीतही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांची मात्र खरेदी झाली. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीतीतील देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या इन्फोसिसच्या निकालावरची ही प्रतिक्रिया होती. कंपनीने या कालावधीत २१.६ टक्के नफा नोंदविला आहे. २५,५४८.३३ अशा तेजीने सप्ताहअखेरची सुरुवात करणाऱ्या शेअर बाजारावर शुक्रवारअखेर मात्र पोर्तुगालवरील कर्ज संकटाची चिंताच अधिक उमटली.
मुंबई शेअर बाजारात मात्र बांधकाम, भांडवली वस्तू, ऊर्जा, पोलाद, तेल व वायू तसेच बँक क्षेत्रातील समभागांची विक्री झाली. विशेष म्हणजे अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद असलेली ही क्षेत्रे आहेत. सत्राची सुरुवात १७५ अंशाने करणारा मुंबई शेअर बाजार व्यवहारात २५ हजारांच्या खाली घसरताना २४,९७८.३३ या दिवसाच्या तळातही येऊन ठेपला होता.
सेन्सेक्स दिवसअखेर महिन्याच्या नीचांकात आला तर त्याची साप्ताहिक आपटी ही डिसेंबर २०११ नंतरची सर्वात मोठी ठरली. निफ्टीची सप्ताहातील २९२ अंश घसरण ही गेल्या जवळपास दीड वर्षांतील, मार्च २०१३ नंतरची आहे.

रुपया पुन्हा भक्कम
सप्ताहअखेरही भांडवली बाजारातील घसरण कायम गेली असली तरी परकी चलन व्यवहारात रुपया पुन्हा एकदा भक्कम बनला आहे. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया २६ पैशांनी उंचावत ५९.९३ वर पोहोचला. मात्र सप्ताहाच्या तुलनेत त्याची घसरण ही गेल्या तीन आठवडय़ांतील पहिली ठरली. चालू आठवडय़ात रुपया २१ पैशांनी घसरला आहे. शुक्रवारी ६०.२५ या गुरुवारच्या तुलनेत किमान स्तरावरच सुरुवात करणारा रुपया सत्रात ६०.३० पर्यंत घसरला. मात्र याच सत्रात तेजीवर पुन्हा स्वार होत रुपया व्यवहारात ५९.९२ वर पोहोचला.
ाराफा बाजारातही तेजी
मुंबईच्या सराफा बाजारातही शुक्रवारी दरांची मात्रा वाढलेली दिसली. सोन्याचा दर पुन्हा एकदा १० ग्रॅमसाठी २८ हजार रुपयांपुढे प्रवास करता झाला. गुरुवारच्या तुलनेत स्टॅण्डर्ड प्रकारच्या सोने दरात ५७० रुपयांनी वाढ होऊन धातू २८,४२५ रुपयांवर गेला, तर चांदीचा किलोचा भावही एकदम १,०३० रुपयांनी वधारत ४६,५०० नजीक, ४६,४३० रुपयांवर गेला. सराफा बाजारात गुरुवारीही तेजी अनुभवली गेली, तर शुक्रवारी नवी दिल्लीत सोने २८,६८० रुपयांपर्यंत जात गेल्या दोन आठवडय़ांच्या उच्चांकावर जाऊन पोहोचला.