सत्राच्या सुरुवातीलाच २९ हजारांवर पोहोचलेल्या मुंबई शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी सप्ताहअखेर वाढत्या महागाईच्या चिंतेने अखेर नफेखोरीचा अवलंब करीत निर्देशांकात मोठी घसरण घडवून आणली. परिणामी,  ४२७.११ अंशांची आपटी नोंदवीत सेन्सेक्स व्यवहारांती थेट २८,५०३.३० वर येऊन ठेपला. तर १२८.२५ अंश घसरणीसह निफ्टी ८,६३१.७५ वर स्थिरावला. शुक्रवारच्या ४०० हून अधिक अंश नुकसानामुळे सेन्सेक्समधील चालू आठवडय़ातील घसरण १२१७ अंशांची झाली आहे. २०१५ मधील ही सर्वात मोठी साप्ताहिक घट आहे. चालू सप्ताहात गुरुवार वगळता इतर चारही दिवशी मुंबई निर्देशांकाने घसरणीचा क्रम राखला आहे. रखडलेल्या विमा विधेयकाला मंजुरीमुळे शुक्रवारी व्यवहाराची जोरदार सुरुवात करत सेन्सेक्स २९ हजारांवर पोहोचला. यानंतर मात्र वरच्या भावाचा लाभ सप्ताहअखेरच्या व्यवहारात पदरात पाडून घेण्याचा मोह दिसून आला.