आठवड्याच्या सुरूवातीलाच भांडवली बाजारात मोठी घसरण झाली आहे. शेअर बाजाराने तीन आठवड्यातील नीचांक गाठला असून सोमवारी ५५५.८९ अंश घसरणीसह सेन्सेक्स २७,८८६.२१ तर १५७.९० अंश घसरणीसह निफ्टी ८,४४८.१० वर थांबला. तंत्रज्ञान,  बांधकाम, ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाल्याने निर्देशांक घसरल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी सकाळच्या सत्रात शेअर बाजाराची सकारात्मक सुरूवात झाली होती. सेन्सेक्समध्ये ९७.३६ तर निफ्टीमध्ये १३.९५ अंकांची सुधारणा आली होती. मात्र, दुपारच्या सत्रात शेअर बाजारात जोरदार घसरण झाली. सध्या सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक अनुक्रमे १.९७ आणि १.८१ टक्क्यांनी कोसळले आहेत.