बाजारात ‘जीएसटी’पूर्व  घसरणचिंता

वस्तू व सेवा करप्रणाली देशभरात लागू होण्यास दोन दिवसांचा अवधी शिल्लक असतानाच त्याच्या अंमलबजावणीबाबतची चिंता मंगळवारी भांडवली बाजारात उमटली. बँक तसेच सार्वजनिक उपक्रमातील समभागांवर विक्रीदबाव निर्माण झाल्याने सेन्सेक्सने ३१ हजारांचा टप्पाही सोडला.

सोमवारी ईदनिमित्त भांडवली बाजारात व्यवहार झाले नाहीत. मात्र मंगळवारी, आठवडय़ाच्या पहिल्या सत्रात मुंबई निर्देशांकाने महिन्यातील सर्वात मोठी घसरण नोंदविली. १७९.९६ अंश घसरणीने सेन्सेक्स ३०,९५८.२५ वर स्थिरावला. तर ६३.५५ अंश घसरणीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ९,५११.४० वर थांबला. निफ्टीने व्यवहारातच ९,५०० च्याही खालचा स्तर अनुभवला होता.

चालू आठवडय़ाच्या व्यवहारांची अखेर येत्या शुक्रवारी होणार असतानाच त्याच मध्यरात्रीपासून वस्तू व सेवा कर मात्रा लागू होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षातील तिच्या अंमलबजावणीबाबतची चिंता मंगळवारी भांडवली बाजारात व्यवहार होताना गुंतवणूकदारांकडून व्यक्त केली गेली. अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हप्रमुखांकडून आगामी व्याजदरवाढीच्या घोषणेचीही बाजाराला आता प्रतीक्षा आहे. जीएसटीमुळे सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील समभाग घसरले.

रिझव्‍‌र्ह बँकेने दिवाळखोर संहिता कायद्यांतर्गत बुडीत कर्ज प्रकरणाविरुद्धची प्रक्रिया राबविताना अतिरिक्त आर्थिक तरतूद करण्याची सूचना केल्यानंतर बँक समभागांमध्ये मंगळवारी लक्षणीय घसरण झाली. रिझव्‍‌र्ह बँकेच्या कृतीमुळे मार्च २०१८ अखेरच्या वित्त वर्षांत बँकांच्या ताळेबंदावर परिणाम होईल, अशी शक्यता जिओजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे प्रमुख संशोधक विनोद नायर यांनी म्हटले आहे.