गेल्या दहा व्यवहारांत नवनवे विक्रम मागे टाकणाऱ्या भांडवली बाजाराच्या निर्देशांकांची शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या नफेखोरीने घसरगुंडी उडाली. सेन्सेक्ससह निफ्टीही त्यांच्या सर्वोच्च टप्प्यापासून सरला. २०१५ वर्षांमधील निर्देशांकांची ही पहिली मोठी आपटी ठरली.
सेन्सेक्समध्ये तब्बल ४९८.८२ अंश घसरण होत मुंबई निर्देशांक २९ हजारांनजीक, २९,१८२.९५ पर्यंत आला. तर १४३.४५ अंश घसरणीसह निफ्टी ८,८०८.९० वर स्थिरावला. प्रमुख निर्देशांकांनी सत्रात मात्र नव्या उच्चांकाला गवसणी घातली. दिवसअखेरच्या घसरणीमुळे त्यांच्यातील आपटी त्यामुळेच विस्तारली. शुक्रवारच्या व्यवहारात नफेखोरीचेच चित्र दिसले. सत्राच्या सुरुवातीपासूनच तेजी नोंदविणाऱ्या प्रमुख निर्देशांकांनी व्यवहारात त्यांच्या नव्या टप्प्याला स्पर्श केला. या वेळी निफ्टी ९ हजारानजीक,  ८,९९६.६० तर सेन्सेक्स २९,८४४.१६ वर गेला होता.e06अमेरिकी चलनाच्या समोर रुपयाचा प्रवास व्यवहारात ६२ पर्यंत घसरल्याची चिंताही भांडवली बाजारात व्यक्त केली गेली. परिणामी मुंबई निर्देशांक सत्रात २९,०७०.४८ च्या तळातही आला. तर व्यवहाराच्या सुरुवातीलाच ९ हजारापासून काही अंतरावरच असलेल्या निफ्टीने व्यवहाराअखेरच्या घसरणीमुळे या टप्प्यापासून अधिक लांबचा प्रवास नोंदविला.
सेन्सेक्सने गेल्या दहा व्यवहारांत २,३४६ अंश तर निफ्टीने याच कालावधीत ६७५ अंश वाढ नोंदविली होती. ही झेप ८ टक्क्यांहून अधिक होती. स्टेट बँकेचा समभाग सर्वाधिक, ५.१३ टक्क्यांनी कोसळला. तर आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी या वित्त क्षेत्रातील कंपन्यांनीही या घसरणीत उडी घेतली. मुंबई निर्देशांकातील २२ समभागांचे मूल्य ढासळले. क्षेत्रीय निर्देशांकातही ३.१४ टक्क्यांसह बँक निर्देशांक घसरणीत वरच्या स्थानावर राहिला.