सार्वजनिक बँकांमध्ये सरकारी भांडवली ओतण्याच्या रूपात अर्थव्यवस्थेत येत असलेल्या सुधाराच्या आशेवर हिंदोळत गुंतवणूकदारांनी मुंबई निर्देशांकाला बुधवारी एकाच व्यवहारात जवळपास अडीचशे अंश वाढविण्यास भाग पाडले. परिणामी तब्बल अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने त्याचा २८ हजाराचा पल्ला पुन्हा एकदा गाठला. तर निफ्टीनेही त्याचा ८,४००चा अनुभव घेतला.
२४०.०४ अंशवाढीसह सेन्सेक्स २८,०२०.८७ वर पोहोचला. ८४.५५ अंशवाढीमुळे निफ्टी ८,४५३.०५ पर्यंत पोहोचू शकला. मुंबई निर्देशांकातील केवळ सात समभाग घसरते राहिले. स्मॉल व मिड कॅप निर्देशांकही सव्वा टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवीत राहिले.
युरो झोनमधील ग्रीसबाबतची कर्जफेड अस्वस्थताही संपुष्टात आल्याने बाजारात व्यवहार करताना नि:श्वास टाकला. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर सार्वजनिक बँकांच्या निधी कमतरतेचा प्रश्न  निकाली निघाल्याचे पडसादही बाजारावर उमटले. मेमधील प्रमुख पायाभूत सेवा क्षेत्राच्या वाढत्या चालीचेही बाजारात स्वागत झाले.
मंगळवारी १३५ अंशवाढ नोंदविल्यानंतर बुधवारच्या तेजीमुळे सेन्सेक्स सत्रात २८,०९९.२५ पर्यंत झेपावला. व्यवहारात २७,७९९.९१ पर्यंत खाली आल्यानंतर त्याचा २८ हजारांवरील दिवसअखेरचा बंद हा गेल्या अडीच महिन्यांनंतर नोंदला गेला. यापूर्वी १७ एप्रिल रोजी सेन्सेक्स २८,४४२.१० पर्यंत गेला होता.