भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बुधवारी रेपो दरांमध्ये कपात जाहीर झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराने उसळी घेत ३०००० अंशांचे ऐतिहासिक शिखर सर केले. रेपो दरांमध्ये पाव टक्क्यांनी कपात करण्यात आल्याच्या कृतीचे सकारात्मक परिणाम बाजार खुला झाल्यानंतर तात्काळ दिसून आले. सेन्सेक्सने पहिल्यांदाच अशाप्रकारची कामगिरी केली असून, ३०००० चा टप्पा भांडवली बाजारासाठी महत्त्वपूर्ण मानला जात होता. गेल्या अडीच महिन्यांमध्ये रिझर्व्ह बँकेकडून दुसऱ्यांदा रेपो दरांमध्ये कपात करण्यात आली. त्यामुळे गृहकर्जधारक आणि सामान्य गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
तत्पूर्वी मंगळवारी देशातील सर्वात मोठा भांडवली बाजार ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला होता. अवघ्या एक दिवसाच्या अंतरातील विक्रमी व्यवहाराने तो आठवडय़ातील दुसऱ्या सत्रात निफ्टीने ९,००० पर्यंत झेप घेतली होती. तर, सेन्सेक्सही १३४.५९ अंशांनी वाढून २९,५९३.७३ अंकांवर स्थिरावला होता. मात्र, बुधवारी बाजार उघडताच रेपो दरांतील कपातीच्या निर्णयाच्या सकारात्मक बातमीने सेन्सेक्सने विक्रमी उसळी घेतली.