‘निफ्टी’ला ८,२०० ची हुलकावणी!
सलग सहा सत्रांतील तेजी गुरुवारच्या व्यवहारामार्फत मोडणारा शेअर बाजार सप्ताहातील अखेरच्या सत्रात पुन्हा २७ हजारांपुढे मार्गस्थ झाला. २३३.७० अंशवाढीसह सेन्सेक्स २७,०७९.५१ या सात आठवडय़ांच्या वरच्या टप्प्यावर विराजमान झाला.
दिवसभरातील तेजीच्या जोरावर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीला थेट ८,२०० चा टप्पा पार करताना ८,२३२.२० हा वरचा सत्रस्तर अनुभवता आला. ६०.३५ अंशवाढीमुळे निफ्टी दिवसअखेर ८,१८९.७० वर स्थिरावला.
व्याजदरवाढीची घाई नसल्याचे स्पष्टीकरण देत ही दरवाढ आता २०१६ च्या सुरुवातीलाच होणार या अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या संकेताने बाजारात तेजी परत फिरली.
बाजाराची नजर आता सोमवारपासूनच सुरू होणाऱ्या कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निकालाच्या हंगामावर असेल. नव्या आठवडय़ाची सुरुवात इन्फोसिसच्या निकालाने होईल. दुसऱ्या तिमाहीच्या निकालाबाबत गुंतवणूकदार आशावादी आहेत.
पोलाद क्षेत्रातील समभागांमध्ये पुन्हा एकदा मूल्य चमक नोंदली गेली. यात वेदान्त, टाटा स्टील, हिंदाल्को यांना अधिक भाव मिळाला. त्याचबरोबर सेन्सेक्समधील टाटा मोटर्स, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, गेल, सिप्ला हे वाढले.
जवळपास २०० अंशांच्या घसरणीच्या रूपात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये गुरुवारी गेल्या सात सत्रांत प्रथमच घसरण नोंदली गेली. यापूर्वी सेन्सेक्सने निर्देशांकात हजाराहून अधिक अंशांची भर घातली आहे.
शुक्रवारी पुन्हा तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या निर्देशांक प्रगतीमुळे साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स ८५८.५६ अंश, तर निफ्टी २३८.८० अंशांनी उंचावला आहे. ही वाढ ३ टक्क्य़ांहून अधिक आहे.