दोलायमान स्थितीत राहूनही अधिक प्रमाणात तेजी नोंदविणाऱ्या भांडवली बाजाराने सप्ताहअखेर ती मागे टाकली. सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदविताना मुंबई निर्देशांकाने तिचा विस्तार केला. २५८.५३ अंश घसरणीसह सेन्सेक्स २८,५०० पासून लांब जाताना थेट २८,११२.३१ वर येऊन ठेपला. निर्देशांकाचा हा पंधरवडय़ाचा तळ आहे. शुक्रवारच्या सत्रात निफ्टी ६८.२५ अंशांनी घसरून ८,५२१.५५ वर स्थिरावला.
आठवडय़ाभरात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ९० अंशांचे नुकसान सोसले आहे. तर सेन्सेक्समधील दोन व्यवहारातील घसरणीचा आकडा ३९२.६२ अंश नोंदला गेला आहे. साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स ३५१ व निफ्टी ८८.३० अंशांनी घसरला आहे. हे नुकसान प्रत्येकी सव्वा टक्क्य़ापेक्षाही अधिक आहे.
बाजारात शुक्रवारी परकी चलन व्यासपीठावर रुपयाने डॉलरच्या तुलनेत ६४ चा फेर धरल्याची चिंता अधिक उमटली. सायंकाळी उशिरा जाहीर होणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तिमाहीत वित्तीय निष्कर्षांची वाट पाहत गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा सपाचा सप्ताहअखेरच्या व्यवहारात लावला.
मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकात जवळपास एक टक्क्य़ाची घसरण झाली. मुंबई शेअर बाजारातील दोन वगळता इतर दहाही क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्समधील घसरणीत आयसीआयसीआय बँक समभाग आघाडीवर राहिला. त्याचबरोबर विप्रोच्या समभाग मूल्यातही तेवढीच, ३.७० टक्क्य़ांहून अधिक आपटी नोंदली गेली.
मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकातही अध्या टक्क्य़ाहून अधिक घसरण सप्ताहअखेर नोंदली गेली. सेन्सेक्समधील २१ समभागांचे मूल्य रोडावले.
ल्युपिन, टाटा मोटर्स, गेल, स्टेट बँक, वेदांता, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, टाटा स्टील, भेल, लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो, कोल इंडिया, इन्फोसिस, अ‍ॅक्सिस बँक, मारुती सुझुकी, आयटीसी, डॉ. रेड्डीज, ओएनजीसी असे सारे आघाडीचे समभाग दिवसअखेर घसरले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये १.५७ टक्क्य़ांसह भांडवली वस्तू निर्देशांकाला घसरणीचा सर्वाधिक फटका बसला.
नव्या आठवडय़ात बाजारात महिन्यातील वायदापूर्तीच्या अखेरच्या दिवसाचे व्यवहार होणार आहेत. तेव्हा नफेखोरीसाठी प्रमुख निर्देशांकावर अधिक दबाव येण्याची शक्यता बाजारतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

रुपया ६४ च्या तळात
मुंबई : डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरण नोंदविणारा रुपया सप्ताहअखेर ६४ पर्यंत खाली आला. शुक्रवारी २७ पैशांनी घसरत रुपया ६४.०४ या गेल्या सव्वा महिन्याच्या नीचांक स्तरावर येऊन ठेपला. भांडवली बाजारातील विदेशी संस्थागतांकडून झालेल्या समभाग विक्रीमुळे डॉलरला मागणी आल्याने स्थानिक चलनाला ओहोटी लागल्याचे मानले जाते. रुपया गुरुवारी ६३.७७ वर बंद झाला होता. आठवडय़ाच्या शेवटच्या व्यवहाराची सुरुवातच रुपयाने मोठय़ा घसरणीने केली. चलन यावेळी ६४ च्या उंबरठय़ावर, ६३.९९ वर होते. रुपयाने यापूर्वी १७ जून रोजी ६४ च्या खालील प्रवास नोंदविला होता. चलन त्यावेळी ६४.१२ पर्यंत घसरले होते. गेल्या तीन व्यवहारातील रुपयाची घसरण ४९ पैशांची राहिली आहे.

सोने आता २४,५०० वर
मुंबई : मौल्यवान धातूतील उतार कामय असून सोने शुक्रवारी तोळ्यामागे २४,५०० रुपयांवर येऊन ठेपले. धातूचा हा २०११ नंतरचा किमान दर स्तर आहे. स्टॅण्डर्ड प्रकारच्या सोने धातूमध्ये व्यवहारअखेर थेट ४४५ रुपयांची घसरण झाल्याने दर १० ग्रॅमसाठी २४,५९० रुपयांवर आला. आठवडय़ात सोने पुन्हा एकदा २५ हजार रुपयांखाली आले आहे. चांदीच्या दरातही शुक्रवारी किलोमागे मोठय़ा फरकाने, ६२० रुपयांची नरमाई आली. पांढरा धातू आता ३४,२१५ रुपयांवर स्थिरावला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने प्रति औन्स १,१०० डॉलरच्याही खाली आले आहे. दरम्यान, सोन्यावरील आयात शुल्कात सरकारने कपात केली आहे. सलग दुसऱ्या आठवडय़ात ती करताना मौल्यवान धातूवरील शुल्क प्रति तोळ्यामागे ३५४ डॉलरवर आणले आहे.

राष्ट्रीय शेअर बाजाराने नुकताच अनुभवलेला ८६५० हा टप्पा जागतिक स्तरावरील एकूणच जोखीम कमी झाल्याने निदर्शक आहे. मात्र बाजाराबाबतची आशा कायम राखण्यासारखी चिन्हे नाहीत हे कंपन्यांच्या तिमाही निकालांवरूनही स्पष्ट होत आहे.
विनोद नायर, मूलभूत संशोधन प्रमुख, जिओजित बीएनपी पारिपास फाय.सव्‍‌र्हि.

भांडवली बाजार गेला आठवडाभर दोलायमान राहिला आहे. भारतात प्रामुख्याने कंपन्यांच्या तिमाही निकालाची चिंता उमटली. युरो, अमेरिकेचे बाजारही आता सावरताना दिसत आहेत. आठवडय़ात निफ्टीत भर पडल्यास हा निर्देशांक ८,८०० पर्यंत जाईल.
विवेक गुप्ता, विश्लेषक संचालक, कॅपिटलव्हाया ग्लोबल रिसर्च.