नजरेच्या टप्प्यात विविध भांडवली बाजारात एकाच समभागाचे मूल्य भिन्न असताना कोणत्या माध्यमातून सर्वोत्तम मूल्य गाठता येईल, अशी माहिती तंत्रज्ञानावरील सुविधा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी प्रथमच अस्तित्वात आली आहे. सध्या केवळ संस्थागत गुंतवणूकदारांसाठी असलेला हा पर्याय आता कोटक सिक्युरिटीजने सादर करताना तो पहिल्यांदाच विनामूल्य देऊ केला आहे.
एकाच कंपनीच्या समभागाचे मूल्य मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारावर नेमक्या वेळी भिन्न असते. मात्र ज्या भांडवली बाजारावर त्या कंपनीचे सर्वोत्तम मूल्य असेल तेव्हा त्या बाजाराची निवड आपोआप होऊन गुंतवणूकदारांना सर्वोत्तम मूल्य कोटक सिक्युरिटीजच्या ‘स्मार्ट ऑर्डर राऊटिंग’च्या व्यासपीठावर मिळणार आहे. सध्या अशी सोय फक्त संस्थागत गुंतवणूकदारांसाठीच आहे. ‘किरकोळ गुंतवणूकदारांना निश्चित समभागाचे सर्वोत्तम मूल्य शोधण्याची गरज यामुळे राहणार नाही. या तंत्रज्ञानाद्वारे खरेदीच्या वेळी कमीत कमी आणि विक्रीप्रसंगी अधिकाधिक मूल्य असलेले समभाग या पर्यायाद्वारे ६६६www.kotaksecurities.com च्या व्यासपीठावर आपोआप निवडला जाणार आहे’, असे कोटक सिक्युरिटीजचे कार्यकारी उपाध्यक्ष बी. गोपकुमार यांनी म्हटले आहे.    

सिंडिकेट बँकेतर्फे आज ‘बृहत सिंड अदालत’चे आयोजन
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील सिंडिकेट बँकेने आपल्या थकीत कर्जदारांना कर्जफेडीसंदर्भात सुलभता प्रदान करणारा दिलासा देणाऱ्या ‘बृहत सिंड अदालत’चे देशभरातील सर्व शाखांमध्ये मंगळवार, २७ नोव्हेंबर २०१२ रोजी आयोजन केले आहे. थकीत कर्ज खात्याबद्दल उभयतांना मान्य असा तोडगा काढून ते फेडण्यासंदर्भात कर्जदारांना सहाय्य करण्याचा हेतू या उपक्रमातून साधला जातो. त्यामुळे अशा कर्जदारांनी आपापल्या शाखांशी त्वरित संपर्क साधून या संधीचा लाभ घ्यावा, असे सिंडिकेट बँकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे.     

एल अ‍ॅण्ड टी फायनान्सची फिडेलिटीवरील ताबाप्रक्रिया पूर्ण
मुंबई : एल अ‍ॅण्ड टी फायनान्स होल्डिंग्ज आणि फिडेलिटी म्युच्युअल फंड यांचे विलिनीकरण सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी मार्गी लागले. हा ताबा व्यवहार ६०० कोटी रुपयांच्या घरात गेला असण्याची शक्यता आहे. या माध्यमातून बिगर वित्तीय कंपनी म्हणून उदयास येत असलेल्या एल अ‍ॅण्ड टी फायनान्सचा  मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रात १२,८०० कोटी रुपयांची गंगाजळी २५ गुंतवणूक उत्पादनांसह प्रवेश झाला आहे. देशातील २०० शहरांमध्ये कंपनीचे आता ९.५ लाखांहून अधिक गुंतवणूकदार झाले आहेत.
देशातील सुमारे ८ लाख कोटी रुपयांच्या म्युच्युअल फंड बाजारपेठेत बऱ्याच कालावधीनंतर साकारलेले हे विलिनीकरण आहे. सर्व उत्पादन श्रेणींमध्ये उत्तम मूल्यसेवा पुरविण्याच्या कंपनीच्या बांधिलकीच्या दृष्टीकोनातूनच हा व्यवहार झाला आहे, असे एल अ‍ॅण्ड टी फायनान्स होल्डिंग्जचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वाय. एम. देवस्थळी यांनी या निमित्ताने बोलताना सांगितले. या व्यवहारपूर्तीसह कंपनीने म्युच्युअल फंड कंपनीतील नव्या अधिकाऱ्यांचीही घोषणा केली. त्यानुसार एस. एन. लाहिरी हे फंड कंपनीच्या इक्विटी विभागाचे प्रमुख तर श्रीराम रामनाथन हे फिक्स्ड इन्कम विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.     

मराठमोळ्या युरोप सहलीचे ‘मँगो’कडून आयोजन
मुंबई : भारतीय पद्धतीचे जेवण, नामांकित हॉटेलमध्ये वास्तव्य, प्रसिद्ध शहरातील प्रमुख वास्तूंना, ऐतिहासिक तसेच प्रेक्षणीय स्थळांना भेटी, तसेच विमानप्रवासासह, व्हिसा, प्रवास विम्यासह अशा सर्व खर्च समावेशक अशा ‘पुणे ते पुणे’ १८ दिवसांच्या युरोपच्या सहलींचे आयोजन मँगो हॉलिडेजने केले आहे. वैशिष्टय़ म्हणजे या सहलीचा व्यवस्थापकही आपुलकीने काळजी घेणारा मराठमोळाच असेल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. युरोपच्या आजवरच्या १७७ सहली आणि २२ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर या मराठमोळ्या युरोप सहलींचे आयोजन करण्यात आल्याचे मँगो हॉलिडेज्चे संचालक मिलिंद बाबर यांनी सांगितले. http://www.mangoholidays.com या वेबस्थळावर सहलीचा संपूर्ण तपशील उपलब्ध आहे इतरांपेक्षा अत्यंत वाजवी दरात ही संपूर्ण सहल असण्याबरोबरच,पहिल्या २० जणांना तिकीटदरात मोठय़ा सवलतीची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले. या युरोप सहलींसाठी राज्यातील पुणे, नाशिक, कोल्हापूर, मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये मोफत मार्गदर्शन मेळाव्यांचे आयोजन येत्या आठवडय़ापासून मँगो हॉलिडेज्ने केले आहे.