श्रीराम समूहातील वित्तीय सेवा क्षेत्रातील श्रीराम कॅपिटल लिमिटेडने आर्थिक पत्रकारितेमधील सर्वोत्कृष्टतेकरिता ‘श्रीराम पुरस्कार’ दाखल केले आहेत. हे पुरस्कार इन्स्टीट्यूट फॉर फायनान्शियल मॅनेजमेंट अँड रिसर्च (आयएफएमआर), चेन्नईच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आले आहेत. वाणिज्य व आर्थिक क्षेत्रातील पत्रकारांना व्यावसायिक सर्वोत्कृष्टतेच्या उच्च क्षितिज गाठण्यकरिता प्रोत्साहन मिळावे यासाठी या पुरस्कारांची स्थापना केली आहे. आर्थिक पत्रकारांनी घेतलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना ओळख मिळवून देणे आणि त्यांना पुरस्कृत करणे असाही पुरस्कारांचा हेतू असल्याचे श्रीराम कॅपिटल लिमिटेडचे अध्यक्ष अरुण दुग्गल यांनी सांगितले. पहिला पुरस्कार वितरण सोहळा एप्रिल २०१३ मध्ये चेन्नईमध्ये होईल. भारताची आर्थिक धोरणे व बृहत-आर्थिक विषय तसेच इक्विटी, ऋण (डेट) आणि विदेशी चलन विनिमय यांचा समावेश असलेली आर्थिक बाजारपेठ अशा या दोन पुरस्कार वर्गवाऱ्या आहेत. आर्थिक पत्रकारितेत २५ वर्षांहून अधिक काळ योगदान दिलेल्या पत्रकाराला सन्मानित करण्यासाठी ‘जीवन गौरव पुरस्कार’ दिला जाणार आहे. दुग्गल हे श्रीराम पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष आहेत. समितीमधील इतर सदस्यांमध्ये श्रीराम ग्रुपचे समूह संचालक जी. एस. सुंदरराजन; श्रीराम लाईफ इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका अखिला श्रीनिवासन; इन्स्टिट्यूट फॉर फायनान्शियल मॅनेजमेंट अँड रिसर्चचे अध्यक्ष सी. व्ही. कृष्णन आणि इन्स्टिट्यूट फॉर फायनान्शियल मॅनेजमेंट अँड रिसर्चचे डॉ. बॉबी श्रीनिवासन यांचा समावेश आहे.