विदेशी चलन व्यासपीठ तसेच व्याजदर निश्चिती प्रकरणात दोषी आढळलेल्या सहा विदेशी बँकांनी अखेर गैरव्यवहाराची कबुली देत एकूण ५.८ अब्ज डॉलरचा दंड भरण्याची तयारी बुधवारी अमेरिकेच्या न्याय विभागासमोर दाखविली.
अमेरिकी डॉलर व युरो चलन व्यवहारात गैर व्यवहार झाल्याचे सिटीकॉर्प, जेपी मॉर्गन चेस अ‍ॅन्ड कंपनी, बार्कलेज व रॉयल बँक ऑफ स्कॉटलॅन्ड (आरबीएस) यांनी मान्य केले आहे. तर यूबीएस समूहाच्या मुख्य बँक शाखेनेही व्याजदरांबाबतचे आक्षेप न्याय विभागासमोर मान्य केले आहेत.
पाच वर्षांपूर्वीच्या ९ अब्ज डॉलरच्या प्रकरणात या बँकांनी विदेशी चलन विनिमय व्यवहारात गैरव्यवहार तसेच व्याजदर निश्चितीबाबत दोषी ठरविण्यात आले होते.
व्याजदर निश्चित करण्यापूर्वी ऑनलाईन चॅटच्या माध्यमातून त्यावर चर्चा करून गैरप्रकारे नेमकी भूमिका ठरविल्याचेही दोषीपैकी एका बँकेने मान्य केले आहे. तर चार बँकांनी डॉलर व युरो चलनाचे मूल्य विदेशी विनिमय व्यासपीठावर निश्चित करताना गैरव्यवहार केल्याची कबुली दिली आहे.