‘कुशल रोजगार व तंत्रज्ञान उपलब्धता’

येत्या काही वर्षांत तंत्रज्ञान क्षेत्रात व उद्योग व्यवसायात मोठय़ा प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कौशल्यपूर्ण प्रशिक्षित मनुष्यबळ असणे अत्यंत आवश्यक आहे, असा सूर ‘कुशल रोजगार व तंत्रज्ञान उपलब्धता’ या सत्रात सहभागी वक्त्यांनी व्यक्त केला.

उत्पादन तंत्रज्ञान, औषधनिर्माण किंवा सागरी व्यापार-वाहतूक क्षेत्रात तुलनेत अधिक श्रम करावे लागतात. अशा ठिकाणी कामाच्या वेळेचे बंधनही फार कमी असते. त्यामुळे या क्षेत्रात नोकरीची पाल्य आणि पालक अशा दोघांच्याही मनाची तयारी नसते, असे निरीक्षण यावेळी उपस्थित तज्ज्ञांकडून मांडण्यात आले.

सुरक्षित, ठरावीक व आखीव वेळेतील आणि ‘व्हाइट कॉलर’ नोकरी त्यांना हवी असते, असे मत व्यक्त करण्यात आले. त्याचबरोबर, या क्षेत्रात तुमच्याकडे उत्तम कौशल्य असेल तर रग्गड वेतनमानाची नोकरीही मिळू शकते; मात्र पालक व पाल्य या दोघांनीही आपली मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.