‘स्पेक्ट्रम’साठी चढय़ा किमतीचा परिणाम..
इतिहासातील विक्रमी ठरणाऱ्या येत्या सप्टेंबरमधील दूरध्वनी लहरी लिलावामुळे दूरसंचार क्षेत्रात पुन्हा एकदा दर युद्ध पेटण्याची शक्यता या क्षेत्रात अव्वल स्थानी असलेल्या भारती एअरटेलने वर्तविली आहे.२,३०० मेगाहर्ट्झ ध्वनिलहरींकरिता महिन्याभरानंतर ५.६६ लाख कोटी रुपयांच्या दूरसंचार ध्वनिलहरी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये भारती एअरटेलही सहभागी आहे.
याबाबत कंपनीच्या भारत व दक्षिण आशिया विभागाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विठ्ठल यांनी म्हटले आहे की, नव्या ध्वनिलहरी लिलावामुळे दूरसंचार कंपन्यांमध्ये पुन्हा एकदा दरयुद्ध पेटण्याची चिन्हे आहेत. या प्रांतात नव्याने दाखल होणाऱ्या काही कंपन्यांमुळे (रिलायन्स जिओ) विद्यमान कंपन्यांना त्यांच्या दूरसंचार सेवेचे दरपत्रक पुन्हा तयार करावे लागेल व कमी दरातील आकर्षक सुविधा पुरवाव्या लागतील.
२०१५ मध्ये झालेल्या दूरसंचार ध्वनिलहरी लिलाव प्रक्रियेत १.१० लाख कोटी रुपयांचा महसूल सरकारला मिळाला होता. या वेळी २९,१३० कोटी रुपयांसह भारती एअरटेल ही आयडिया सेल्यूलरनंतरची दुसरी मोठी बोलीधारक ठरली होती. देशव्यापी ध्वनिसंचार परवानाप्राप्त रिलायन्स जिओची ४जी तंत्रज्ञानावरील दूरसंचार सेवा ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.