आयबीएम, गुगल, गोडॅडी, व्हेरिओ, नेटवर्क सोल्यूशन्स या अमेरिकेतील अब्जावधी डॉलरच्या उलाढाली असलेल्या कंपन्यांच्या उच्च-तंत्रज्ञानाने समर्थ सेवा भारतीय बाजारपेठेत प्रवाहित करण्यात भागीदार म्हणून मोलाची भूमिका बजावलेल्या सीजीएस इन्फोटेकचा गौरव करण्यात आला. अमेरिकेचे मुंबईतील महावाणिज्यदूत थॉमस वाजदा यांनी गौरवपत्र देऊन सीजीएस इन्फोटेकचे हितेन भुता यांना अलीकडेच सन्मानित केले. भारत-अमेरिकी व्यापार सहकार्यात योगदानाबरोबरच, सीजीएसकडून देशभरात अनेक लघू व मध्यम उद्योगांच्या व्यवसाय उन्नत्तीसाठी पूरक ठरेल अशा अत्याधुनिक तंत्रज्ञान, क्लाउड कॉम्प्युटिंग, डिजिटल मार्केटिंग आणि सॉफ्टवेअर विकास सेवा राबविली जात आहे, असे भुता यांनी या प्रसंगी मत व्यक्त केले. 

सिंडिकेट बँकेकडून ८९ व्या स्थापनादिनी ८९ नवीन शाखांचे उद्घाटन
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील सिंडिकेट बँकेने २० ऑक्टोबरला आपला ८९ वा स्थापनादिन ८९ नवीन शाखा आणि एटीएमचे उद्घाटन करून साजरा केला. तसेच यानिमित्ताने बँकेने आपल्या ग्राहकांसाठी पाच नवीन बँक उत्पादनेही सेवेत आणली. बँकेच्या नवीन उत्पादनांच्या ‘ई-उद्घाटना’चा समारंभ केंद्रीय रसायन आणि खतमंत्री अनंत कुमार यांच्या हस्ते संपन्न झाला. बंगळुरूत झालेल्या या समारंभाला बँकेचे कार्यकारी संचालक एम. अंजनेय प्रसाद, टी. के. श्रीवास्तव, संचालक मंडळावरील इतर सदस्य आणि बँकेचे अधिकारी, कर्मचारी व ग्राहक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. स्थापना दिनानिमित्त सिंडिकेट बँकेच्या देशभरातील सर्व प्रादेशिक कार्यालयांतर्फे एकाच दिवशी रक्तदान शिबिरांचे आणि ग्राहक सभांचेही यानिमित्ताने आयोजन करण्यात आले. मुंबई प्रादेशिक कार्यालयात आयोजित ग्राहकसभेत मुंबई विभागाचे महाव्यवस्थापक व्ही. गणेशन, बँकेच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे महाव्यवस्थापक उदय शंकर मुजूमदार, उपमहाव्यवस्थापक दिनेश पै आणि बिजूमणी आणि सहाय्यक महाव्यवस्थापक प्रवीण भट उपस्थित होते.