राज्यातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरास चालना देण्यासाठी राज्य सरकारने ऑटो डेस्क इन्क. या कंपनीबरोबर सामंजस्याच्या कराराची गुरुवारी घोषणा केली. ‘मेक इन महाराष्ट्र’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेला पाठबळ आणि सर्वाधिक रोजगार निर्माण करणाऱ्या छोटय़ा उद्योजकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक बनविण्यासाठी हा उपक्रम मदतकारक ठरणेअपेक्षित आहे.

राज्याचे उद्योग सचिव अपूर्व चंद्र आणि ऑटो डेस्क इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप नायर गुरुवारी हॉटेल ट्रायडन्ट, मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत या सामंजस्य कराराची घोषणा केली.

राज्याच्या उद्योग विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या आणि एक कोटी रुपयांपेक्षा कमी वार्षिक उलाढाल असणाऱ्या सूक्ष्म उद्योगांसाठी संगणकसमर्थित कॅड आणि कॅमआधारित ऑटो डेस्कचे क्लाऊडवर आधारित ‘फ्यूजन ३६०’ ही सॉफ्टवेअर प्रणाली गुरुवारच्या सामंजस्य करारामुळे मोफत उपलब्ध होईल. त्यासाठी काही ठरावीक निकषांची उद्योगांना पूर्तता करावी लागेल.

तर एक कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असणाऱ्या लघू व मध्यम उद्योगांकरिता दोन वर्षांच्या वैधतेसह १,९९९ रुपये किमतीत सॉफ्टवेअर प्रणाली शासनाच्या ‘महाऑनलाइन’ या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.