भारतातील स्मार्टफोनची बाजारपेठ वेगाने विस्तारत आहे. सन २०१३ मध्ये स्मार्टफोनची विक्री तीन पटीने वाढून ४४ दशलक्ष इतकी झाली. मायक्रोमॅक्स आणि कार्बनसारख्या कंपन्यांनी सर्वसामान्यांना परवडतील अशा किमतीत स्मार्टफोन उपलब्ध करून दिल्यामुळे भारतातील बाजारपेठ फोफावल्याचे याबाबत संशोधन करणाऱ्या आयडीसी या संस्थेने नमूद केले आहे.
२०१२ मध्ये स्मार्टफोनची एकूण विक्री १६.२ दशलक्ष इतकी होती. त्यानंतर २०१३ मध्ये स्मार्टफोनसाठी भारत ही जगातील सर्वात झपाटय़ाने वाढणारी बाजारपेठ म्हणून उदयास आली. स्थानिक कंपन्यांनी स्वस्तात विविध सेवा पुरवणारे स्मार्टफोन बाजारात उपलब्ध केल्यामुळे विक्रीत वाढ झाल्याचेही आयडीसीने नमूद केले आहे.
२०१३ च्या चौथ्या टप्प्यात ३८ टक्के बाजार काबीज करणाऱ्या सॅमसंगने स्मार्टफोन बाजारातील आघाडीचे स्थान कायम राखले आहे. त्याखालोखाल मायक्रोमॅक्स (१७ टक्के), कार्बन (१० टक्के), सोनी (पाच टक्के), लाव्हा (४.७ टक्के)यांनी बाजारपेठेत आपले स्थान निर्माण केले आहे.
फीचर फोन आणि स्मार्टफोनच्या किमतींमधील फरक थोडाच असल्यामुळे ग्राहक स्मार्टफोनकडे अधिक वळताना दिसत आहेत. त्यामुळे देशातील एकूण फोनच्या विक्रीने उंची गाठली असून २०१२ मध्ये २१८ दशलक्ष असणारी मोबाइल विक्री २०१३ मध्ये २५७ दशलक्ष इतकी वाढली.
स्मार्ट स्पर्धा..
क्रमवारी   स्पर्धक कंपनी        बाजारहिस्सा
१             सॅमसंग                       ४०.७%
२             मायक्रोमॅक्स               १९.३%
३             कार्बन                          ८.६%