भारतातील स्मार्टफोनच्या वेगाने विस्तारत असलेल्या बाजारपेठेसह मोबाइलवरील अ‍ॅपचा व्यापार आणि मोबाइल डेटाच्या वापरात वाढीसह महागडय़ा स्मार्टफोन्सना विम्याचे संरक्षण प्रदान करणाऱ्या विमा व्यवसायालाही बरकत दिली आहे.
भारतात सध्या सुमारे ९४ कोटी मोबाइल वापरणारी लोकसंख्या असून २०१८ सालापर्यंत त्यापैकी स्मार्टफोनची संख्या ५० कोटींवर जाणे अपेक्षित असल्याचा ‘डेलॉइट’ या संशोधन संस्थेचा कयास आहे, तर भारतात वार्षिक सरासरी ७५ टक्के इतक्या प्रचंड दराने अ‍ॅप डाऊनलोडचे प्रमाण वाढत असल्याचेही या संस्थेचा अहवाल सांगतो. २०१४-१५ सालात केले गेलेले ९०० कोटी अ‍ॅप डाऊनलोड केले गेले, तर हेच प्रमाण २०१२ सालात १५६ कोटी डाऊनलोड्स असे होते. यावरून दूरसंचार प्रदात्या कंपन्यांचा प्रति ग्राहक मोबाइल डेटा वापर त्याच प्रमाणात वाढत आला, असेही अनुमान काढता येईल.
दुसरीकडे महागडय़ा स्मार्टफोनचा विमा उतरविण्याचा प्रघात ग्राहकांमध्ये वाढत आहे. या क्षेत्रात कार्यरत व आघाडीची डिजिटल अ‍ॅप वितरक कंपनी ‘अ‍ॅप्सडेली’ने सरलेल्या २०१४-१५ सालात आपल्या ३० लाख स्मार्टफोनधारक ग्राहकांसाठी उतरविलेल्या विम्याचे मूल्य तब्बल २,५०० कोटी रुपयांच्या घरात जाणारे आहे. सामान्य विमा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी न्यू इंडिया अश्युरन्समार्फत अ‍ॅप्सडेलीने हा विमा सरलेल्या वर्षांत उतरविला आहे. अ‍ॅप्सडेली त्या बदल्यात आपल्या ग्राहकांना स्मार्टफोनची चोरी, बिघाड अथवा नासधूस झाल्यास भरपाई देणारे विमा संरक्षण पुरविते.
देशभरातील ७०० हून अधिक शहरांत सुमारे १० हजार विक्रेत्यांमार्फत डिजिटल अ‍ॅप्सच्या विक्रीत कार्यरत अ‍ॅप्सडेलीकडून परिपूर्ण मोबाइल संरक्षण उपाययोजना पुरविली जाते. २००९ सालात कार्यरत झालेल्या अ‍ॅप्सडेलीने आजवर ३.१० कोटी व्हायरस स्कॅन आणि ५० कोटींहून अधिक गहाळ झालेले फोन कॉन्टॅक्ट्स क्रमांक ग्राहकांना पुन्हा मिळवून (बॅक अप) दिले आहेत.