झी समूहातील क्रीडा वाहिनीची स्पर्धकाकडून २,५७९ कोटींना खरेदी

माध्यम क्षेत्रातील झी समूहातील टेन स्पोर्ट्ससह काही वाहिन्यांची सोनी पिक्चर्स नेटवर्क्‍सने २,५७९ कोटी रुपयांना खरेदी केली आहे. याबाबतच्या प्रस्तावाला उभय कंपन्यांच्या संचालक मंडळाने बुधवारी मंजुरी दिली. हा व्यवहार रोखीने झाल्याची माहिती मुंबई शेअर बाजाराला देण्यात आली आहे.

झी एंटरटेनमेंट एंटरप्राईजेस अखत्यारीतील टेन स्पोर्ट्स नेटवर्क्‍सद्वारे टेन स्पोर्ट्ससह टेन क्रिकेट, टेन गोल्फ एचडी, टेन१-२-३ आदी वाहिन्याही आता सोनीच्या व्यवसायांतर्गत समाविष्ट झाल्या आहेत.

दक्षिण आशियातील अनेक देशांमध्ये झी समूहातील या वाहिन्यांचे मोठय़ा संख्येने दर्शक आहेत. नव्या व्यवहारामुळे कंपनीचे या भागातील स्थान अधिक भक्कम होणार असल्याचा विश्वास सोनी पिक्चर्स नेटवर्क्‍सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. पी. सिंग यांनी व्यक्त केला आहे. टेन स्पोर्ट्स नेटवर्क्‍समधील टेन गोल्फ एचडी, टेन क्रिकेट, टेन स्पोर्ट्स आदी मालदीव, सिंगापूर, हाँगकाँग, मध्य पूर्व देशांमध्ये प्रसारण होते. सोनी ईएसपीएनच्या सादरीकरणानंतर या नव्या व्यवहारामार्फत कंपनीला ८० कोटी भारतीय दर्शकांपर्यंत पोहोचता येईल, असे सोनी पिक्चर्स नेटवर्क्‍सचे अध्यक्ष अँडी कॅपलन यांनी म्हटले आहे.

सोनी समूहातील क्रीडाविषयक प्रसारण व्यवसायातून कंपनीला गेल्या आर्थिक वर्षांत ६३१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. मात्र कंपनीला या कालावधीत ३७.२० कोटी रुपयांचे नुकसानही झाले होते. झी समूहाने टेन स्पोर्ट्स दुबईस्थित अब्दुल रेहमान बख्तीर यांच्या मालकीच्या ताज ग्रुपमार्फत २००६ मध्ये खरेदी केले होते.