स्पाईसजेट
मुंबई : गेल्या पाच तिमाहीपासून ताळेबंदात नफा नोंदविणाऱ्या स्पाईसजेटला मुंबई शेअर बाजाराने स्पष्टीकरण मागविले आहे. निधी उभारणीच्या प्रयत्नात असलेल्या कंपनीतील मोठा हिस्सा विक्रीबाबत सुरू e03असलेल्या चर्चेवरून स्पाईसजेटला खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी कंपनी निधी उभारणीचे सर्व प्रयत्न करत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे; मात्र प्रवर्तकांचा हिस्सा विकण्यात येणार नाही, असेही नमूद करण्यात आले आहे. देशातील दुसरी हवाई कंपनी व भारतीय हवाई क्षेत्रात जवळपास २० टक्के हिस्सा राखणाऱ्या स्पाईसजेटमध्ये सन समूहाचे कलानिधी मारन यांची ५८.४ टक्के मालकी आहे. कंपनीने सप्टेंबर २०१३ अखेर ३१० कोटी रुपयांचा तोटा सहन केला आहे. वर्षभरापूर्वीच्या ५५९ कोटी रुपयांच्या तुलनेत यंदाचे नुकसान कमी असले तरी कंपनीने यापूर्वी १,००० कोटी रुपयांचा तोटा नोंदविला आहे. कंपनीची काही उड्डाणे स्थगित करण्यात आल्याचीही चर्चा आहे.

एअर एशिया
नवी दिल्ली : एअर एशिया आणि टाटा समूह यांच्या भागीदारीतील नव्या एअर एशियाला हवाई वाहतुकीसाठी दिलेली परवानगी गैर असल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी शुक्रवारी केला. तीन कोटी डॉलरना झालेला याबाबतचा व्यवहार थेट विदेशी गुंतवणूक धोरणानुसार झाला नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. जी. रोहिणी आणि प्रदीप नंदराजोग यांच्यासमोर आपले म्हणणे मांडताना स्वामी यांनी, विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाला कंपनीचे नियंत्रण भारतीय प्रवर्तकांकडे असल्याचे दाखविण्यात आले, असे म्हटले. स्वामी यांनी यापूर्वी टाटा – सिंगापूर एअरलाइन्स भागीदारीलाही आक्षेप नोंदविला आहे. भारतीय विमान सेवा क्षेत्रात ४९ टक्केपर्यंत थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा लागू करण्यात आली आहे.